इंदापूर शहरातील पुणे सोलापूर मार्गावरील वर्दळीच्या असणाऱ्या बाबा चौकात आज दुपारी नेचर डिलाईट डेअरीच्या दूध वाहतूक करणाऱ्या टँकरने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चार वर्षांचे बालक जागीच ठार झाले, तर गाडीवरील तीन जण जखमी झाले आहेत.
आदित्य ज्ञानेश्वर साठे (वय 4 वर्ष रा. चाळीस फुटी रोड, इंदापूर) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आदित्य ची आई अश्विनी ज्ञानेश्वर साठे ( वय 30) व दुचाकीचालक गौरव राजेंद्र मिसाळ ( वय 21 रा. माळवाडी नंबर 2 ता. इंदापूर) व जवळपास साधारणपणे दोन वर्षाचे बाळ नाव माहीत नाही हे जखमी झाले असून गौरव मिसाळ व अश्विनी ज्ञानेश्वर साठे हे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सुदैवाने दुसऱ्या दोन वर्षे बालकास मार जास्त लागला नसून ते सुखरूप आहे. हा अपघात आज (रविवार) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. टँकर चालकास इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्रचंड वर्दळीचा असणाऱ्या बाबा चौकात भरधाव वेगाने जात असलेल्या नेचर दूध संघाच्या दूध टँकरने ( क्रमांक एम. एच. 10 झेड -13 59 ) टीव्हीएस कंपनीच्या दुचाकीस (स्कुटी) ( क्रमांक एम. एच. 42 ए. झेड – 25 58 ) धडक दिल्याने टँकरच्या पुढील चाकात दुचाकी अडकली. पुढे जवळपास पन्नास ते साठ फुटापर्यंत दुचाकी फरफटत गेली.
आज दुपारी बाबा चौकात असणार्या लहान मुलांच्या दवाखान्यातून अश्विनी साठे या आपल्या लहान मुलास तपासून त्यांच्या टीव्हीएस कंपनीच्या गाडीवरून घरी जात असताना सोलापूरच्या दिशेने जात असलेल्या नेचर डिलाईट कंपनीच्या दूध टँकरने दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली व टँकर चालकाने टँकर न थांबवता तसाच चालू ठेवला होता. टँकरच्या पुढच्या उजव्या चाका मध्ये दुचाकी स्कुटी अडकून पडली होती मात्र टँकर चालकाने टँकर तसाच चालू ठेवला होता. त्यामुळे जवळपास पन्नास ते साठ फुटापर्यंत चाकात अडकलेली दुचाकी तशीच फरपटत गेलेल्या दुचाकीवरील जखमी झालेल्या मधील दोन लहान बालकांपैकी एका बाळाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील इतर तिघे जण जखमी झाले.
यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अपघाताच्या ठिकाणी पोलिस आल्याने पुढचा अनर्थ टळला.
जुना पुणे-सोलापुर महामार्ग असलेल्या इंदापूरच्या बाबा चौकात पोलीस फक्त शोसाठी आहेत की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे, मात्र अवजड वाहनांना इंदापूर शहरात प्रवेश नसतानाही पोलिसांची त्यांच्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. इथे दुचाकीवर कारवाई केली जाते, मात्र अवजड वाहने बायपास मार्गे न जाता इंदापूर शहरातून जात असली तरीही त्यांना अडवण्याचे धारिष्ट्य पोलिसांनी आजपर्यंत दाखवलेले नाही. त्यातून अशा घटना घडत आहेत.











