शिरूर : महान्यूज लाईव्ह
पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन दिवसात शिरूर शहर व परिसरात सलग कारवाया करून एम डी ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान शिरूर तालुक्यात एम डी ड्रग्ज येतेय कुठून असा सवाल आता सर्वसामान्यांना पडला आहे.
शिरूर शहर व तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून एमडी ड्रग्स चे मोठ्या प्रमाणावर प्रकरणे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणत अनेक आरोपी अटक केली आहेत. दोन दिवसांपूर्वी मलठण परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकत दोन आरोपींना अटक करत 110 ग्रॅम एम डी सह २० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तर त्या पाठोपाठ शिरूर शहर परिसरात मिळालेल्या माहितीनुसार पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिसांनी सापळा रचून श्रीगोंदा तालुक्यातील दोन आरोपी अटक करत २० ग्रॅम एम डी,गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ असा एकूण ९ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर,पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार संजय पंड्याळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ यांसह शिरूर पोलिसांनी केली आहे.पुढील तपास शिरूर पोलिस करत आहे.
दरम्यान शिरूर शहरात गेल्या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स प्रकरणे उघडकीस येत असले तरी शिरूर शिरूर शहर व तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येतेच कुठून? असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. एमडी हे ड्रग्ज सर्वात हानिकारक प्रकारचे असून तरीही शिरूर तालुक्यातील अनेक युवक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यावर वेळीच कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.











