ज्ञानेश्वर रायते, बारामती
प्रेमविवाहाचं ठिकाण म्हणजे आळंदी! असं समीकरण गेल्या काही वर्षात बनू लागलं आहे आणि नवीन प्रेमीयुगुलांची लग्नासाठी आळंदीला पहिली पसंती मिळू लागली आहे. दिवसाला शंभर ते दीडशे लग्न या आळंदीत होतात.. अर्थात त्यात वावगं काय आहे का? तर काही वाटायचं कारण नाही; पण आता एका घडलेल्या घटनेने या सगळ्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आळंदी मधील लग्न लावून देणाऱ्या एका विवाहसंस्थेच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील असे एक लग्न लावून दिलं की, ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एवढी देखील खातरजमा करता आली नाही की, ज्यांचे आपण रितसर लग्न लावत आहोत, ते वर आणि वधू एकाच भावकीतील आहेत.. थोडक्यात नात्याने भाऊ बहीण लागतात.. मग हे प्रकरण पोलिसांपर्यंत देखील पोहोचले.. पण लग्न तर आता लागलेले आहे आणि नवरदेव आणि नवरी देखील या लग्नाविषयी ठाम आहेत. त्यामुळे कुटुंब आणि नातेवाईकांचा तर प्रश्नच वेगळा! पण या घटनेने आता अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.
आळंदीतल्या वारकरी शिक्षण संस्थांविषयी अनेक चर्चा सुरू असतानाच आता आळंदीतल्या या लग्न लावून देणाऱ्या यंत्रणांबाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अगदी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यात सोशल मीडियावर येथील विवाह संस्थांच्या जाहिराती पाहायला मिळतात आणि अगदी ठामपणे तुमचे लव्ह मॅरेज, कोर्ट मॅरेज, रजिस्टर मॅरेज, तात्काळ लग्न, अशा विविध प्रकारच्या लग्नाची आम्ही सोय लावून देऊ असे धडधाकटपणे या संस्था नमूद करून त्यांचे नंबर जाहिरातीमध्ये देत आहेत.
अगदी 15 हजार रुपयात देखील व अर्ध्या पाऊण तासात हे लोक लग्न लावून देत असल्याने पळून जाऊन लग्न करणाऱ्यांची पहिली पसंती या लोकांकडे व आळंदीला आहे. या सर्व प्रकारावर नियंत्रण असायला हवे असा सूर मात्र आता उमटू लागला आहे. देवाच्या आळंदीतील रितसर लग्न लावून देता देता होऊ लागलेला अनैतिक बाजार आता नियंत्रणात यायला हवा असाच हा सूर आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आणि राहत्या पत्त्याचा पुरावा एवढी कागदपत्र या लग्नासाठी पुरेशी होतात. रितसर लग्न लागलं की, जोडप्याला लगेच प्रमाणपत्र दिले जाते. आळंदीत लहान मोठी मिळून 150 कार्यालय तर 500 पेक्षा अधिक धर्मशाळा आहेत.











