इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय व्यक्तीचा लोखंडी रॉडने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार (ता.20) दुपारी घडली.
या प्रकरणी दोन जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून छगन पांडुरंग भिसे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर धुळदेव उर्फ देवा तुकाराम माने (रा. खुळेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि अशोक भानुदास टकले (रा. तरंगवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत अमोल छगन भिसे (रा.तरंगवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 20 जून रोजी दुपारच्या सुमारास तरंगवाडी गावच्या हद्दीतील वाघजाई चौक परिसरातील रस्त्यावर ही घटना घडली असून कथित अनैतिक संबंधांच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यातून दोन्ही आरोपींनी संगनमत करून लोखंडी रॉडने छगन भिसे यांच्या डोक्यावर गंभीर वार केले, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळाला भेट देत तपासाबाबत सूचना केल्या त्यानरूप पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तपासाची चक्रे फिरवीत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करत आहेत.










