पुणे : महान्यूज लाईव्ह
देशातील प्रमुख आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी फेज-2 येथील Think Technology India या आयटी कंपनीने अचानक कार्यालय बंद केल्याचा आरोप होत असून, या घटनेमुळे 700 हून अधिक कर्मचारी, इंजिनिअर्स आणि इंटर्न्स बेरोजगार झाल्याचे समोर आले आहे. अनेक महिन्यांपासून पगार न मिळणे, पगारासाठी दिलेले धनादेश बाऊन्स होणे आणि कर्मचाऱ्यांकडून सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली पैसे उकळल्याचे गंभीर आरोप कंपनीवर करण्यात आले आहेत.
हिंजवडीतील Gera’s Imperium Rise या व्यावसायिक संकुलात कार्यरत असलेल्या कंपनीने 2025 दरम्यान मोठ्या प्रमाणात भरती मोहीम राबवली होती. यात फ्रेशर्स, इंटर्न्स आणि अनुभवी आयटी व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी देण्यात आल्या होत्या. सुरुवातीच्या काळात कर्मचाऱ्यांना वेतन आणि इंटर्न्सना दरमहा 15 हजार रुपयांचे स्टायपेंड नियमित मिळत असल्याने कंपनीबाबत विश्वास निर्माण झाला होता.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2026 च्या सुरुवातीपासून कंपनीची आर्थिक परिस्थिती ढासळू लागल्याचे संकेत मिळू लागले. फेब्रुवारी महिन्यापासून पगार वेळेवर मिळणे बंद झाले. दर महिन्याच्या 7 किंवा 8 तारखेला मिळणारा पगार उशिरा मिळू लागला किंवा मिळेनासा झाला.
याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडे वारंवार विचारणा करण्यात आली असता, कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कंपनीमध्ये अंतर्गत ऑडिट सुरू असल्याचे कारण देत कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले. फेब्रुवारी महिन्याचा पगार 25 ते 28 फेब्रुवारीदरम्यान जमा केला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र ठरलेल्या कालावधीनंतरही कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा झाला नाही.
पगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यानंतर आणखी मोठा धक्का बसला. कंपनीचे कार्यालय अचानक बंद असल्याचे समोर आले. कार्यालय बंद झाल्याची माहिती मिळताच कर्मचारी आणि इंटर्न्समध्ये एकच खळबळ उडाली. अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा नोटीस देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या घटनेमुळे शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवले असून अनेकांचे करिअर आणि आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे.
काही कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे की, थकीत पगारासाठी कंपनीकडून देण्यात आलेले धनादेश बँकेत जमा केल्यानंतर ते बाऊन्स झाले. त्यामुळे अनेक कर्मचारी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. घरभाडे, बँक कर्जाचे हप्ते, शिक्षण शुल्क आणि दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले असल्याची व्यथा अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे अनेक कर्मचारी इतर शहरांमधून पुण्यात नोकरीसाठी आले होते. त्यामुळे त्यांच्यावर राहणीमानाचा अतिरिक्त आर्थिक भारही पडला आहे. या प्रकरणाची दखल Forum of IT Employees (FITE) या कर्मचारी संघटनेने घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने प्रभावित कर्मचारी मदतीसाठी संघटनेकडे आले असून या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
माने यांनी आणखी एक गंभीर आरोप करताना सांगितले की, कंपनीने कर्मचाऱ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 15 हजार रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट घेतले होते. कंपनी अचानक बंद झाल्यानंतर या रकमेचे काय होणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून संबंधित कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची आणि भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे. पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होण्याची शक्यता असून, प्रभावित कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











