‘रविराज’ नावाचा टॅटू असलेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू — भिगवण पोलिसांकडून सखोल तपास सुरू
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावाच्या हद्दीत पुलाखालील पाण्यात एका महिलेचा कुजलेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहामुळे खुनाचा गंभीर संशय व्यक्त होत असून, भिगवण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती-भिगवण राज्य मार्गावरील मदनवाडी पुलाखाली हा मृतदेह स्थानिक नागरिकांना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक पाहणीअंती पोलिसांनी सांगितले की, मृत महिला अंदाजे २५ ते ३० वर्षांची असून ती सहा ते सात महिन्यांची गरोदर होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून, त्याला सुमारे पाच ते सहा दिवस झाले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महिलेच्या डाव्या हातावर “रविराज” असे टॅटू आढळून आले असून, त्यावरून तिची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
प्राथमिक तपासानुसार, महिलेचा खून करून मृतदेह पुलाखाली टाकण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. परिसरात मोठी गर्दी जमल्याने काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. भिगवण पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास बहुविध अंगाने सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हरवलेल्या महिलांच्या नोंदी, तसेच मोबाईल लोकेशन डेटा तपासले जात आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या महिलेची ओळख पटणे हेच सध्या तपासातील सर्वात मोठे आव्हान ठरले आहे.
ओळख पटल्यानंतर या गर्भवती महिलेच्या हत्येमागील कारण आणि आरोपींची ओळख समोर येईल, असा विश्वास पोलिस तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मदनवाडी परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.











