घनश्याम केळकर, बारामती
शेतीच्या कामात ड्रोनचे महत्व सतत वाढते आहे. हे लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील महिलांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण पुणे जिल्हा आनंद यात्रेत दिले जाणार आहे.
पुणे जिल्हा आनंद यात्रा ५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून जाणार आहे. ही ८०० किमीची पायी यात्रा असून जिल्हयात ४० ठिकाणी मुक्कामी असणार आहे. यावेळी जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला आणि शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. याच कालावधीत महिलांसाठी ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रमही प्रत्येक तालुक्यात आयोजित केले जाणार आहेत.
बारामतीच्या भूमिपूत्र सोशल फौंडेशनतर्फे या यात्रेचे नियोजन केले आहे. जेष्ठ नागरिक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, फेडरेशन ऑफ बॉडी अॅन्ड ऑर्गन डोनेशन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे जिल्हा कलाध्यापक संघासह अनेक सामाजिक संस्था या यात्रेत सहभागी होणार आहेत.
मुंबई येथील सामाजिक संस्था ड्रोन उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण देणार आहेत. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या सीमा सरोज यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्या महिलांना किंवा बचत गटांना ड्रोनचे प्रशिक्षण घ्यावयाचे असेल त्यांनी भूमिपूत्र सोशल फौंडेशनशी ९८८१०९८१३८ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात आले आहे.











