चार अज्ञात चोरट्यांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दौंड : महान्यूज लाईव्ह
चौफुला ते मोरगाव रोडवर पडवी सुपा घाटाच्या पायथ्याशी रविवारी ( दि 13 ) पहाटे सव्वा एकच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी सुमारे 19 लाख रुपयांचा ऐवज लुटला.
काही दिवसांपूर्वी पुणे सोलापूर महामार्गावर मळद येथे वाहनचालकाला मारहाण करून तीस लाख रूपये लुटण्याची घटना घडली होती, आता पुन्हा दौंड तालुक्यात चौफुला मोरगाव रोडवर पडवी हद्दीत वाहनचालकाला वाहनासह लुटण्याची घटना घडली, यामुळे तालुक्यात खळबळ उडाली.
यवत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अशोक लेलेन्ड कंपनीचा सोनेरी लाल रंगाचा मालवाहतूक ट्रक (क्रमांक MH 10 CR 4149 ) हा चौफुला ते मोरगाव रोडवरून सांगलीकडे प्रवास करीत होता. पडवी हद्दीतील गायकवाड मळा येथील ओढ्यात पाठीमागून चार अज्ञात चोरटे काळ्या रंगाच्या कारमधून आले. त्यांनी मालवाहतूक ट्रकला कार आडवी लावुन रस्ता रोखून धरला. वाहन चालक रफिकउद्दीन खान व सहकारी अनिल चौहान यांच्या गळ्याला चाकू लावून ताब्यातील टेंपोट्रक व त्यामधील माल व त्यांच्याकडील रोख रक्कम असा 19 लाख 7 हजार रकमेचा माल चोरटयांनी चोरून नेला.
या चोरीत आठ लाख किमतीचा ट्रक, 9 लाख 51हजार 109 रूपये किमतीचे कपडयाचे धाग्यांचे 146 बंडल, 1लाख 51 हजार 975 रूपये किमतीचे प्लॅस्टीकचे 12 रोल व 4 हजार रोख रक्कम त्यामध्ये असा ऐवज चोरट्यांनी चोरला.
याबाबत रफिकउददीन अब्दुलशकुर खान (वय 48 वर्षे, व्यवसाय ट्रक चालक रा. सिंध्दीभोंडीया ता. पितुमपुर. जि.धार. राज्य मध्यप्रदेश) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सई भोरे, यवतचे पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली असून तसेच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके पाठविण्यात आली आहेत.










