कोव्हिड रुग्णालये बंद ठेवण्याच्या निर्णयानंतर प्रशासनाची बैठक
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील आरोग्य हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या हल्लेखोराला येत्या ४८ तासात अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले. आज बारामतीतील डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत कोव्हिड रुग्णालये बंद ठेवण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी वरील आश्वासन दिले. तर संबंधित हल्लेखोरावर गंभीर गुन्हे दाखल असून लवकरच त्याच्यावर तडीपारीची कारवाई करणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी जाहीर केले.
दोन दिवसांपूर्वी बारामतीतील आरोग्य हॉस्पिटलमधील कोरोनाबाधित रुग्ण दगावल्याने तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी शिवाजी जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु अद्याप आरोपीला अटक होत नसल्याने शहरातील डॉक्टरांसह मेडीकोज गिल्ड, आयएमए या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कोव्हिड हॉस्पिटल बंद ठेवण्याचा इशारा दिला होता.
या संदर्भातील निवेदन आज प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, डॉ. सदानंद काळे, डॉ. मनोज खोमणे, मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्या उपस्थितीत संबंधित शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली.
मेडिकोज गिल्डचे अध्यक्ष डाॅ. संजय पुरंदरे, सचिव डाॅ. तुषार गदादे, डॉ. विशाल मेहता, डॉ. सुजित अडसूळ, डॉ. राहुल जाधव, आयएमएचे विभावरी सोळुंके, संतोष घालमे, डाॅ. आशिष जळक, डाॅ. चंद्रकांत पिल्लई, डाॅ. राजेंद्र चोपडे, डाॅ. प्रशांत मांडण, डाॅ. राजेश कोकरे, डाॅ. प्रदीप व्होरा, डाॅ. डी. एन. धवडे, डाॅ. प्रशांत माने, डाॅ. दिनेश ओसवाल, डाॅ. चंद्रशेखर धुमाळ, डाॅ. सचिन घोरपडे, डाॅ.पांडूरंग गावडे, डाॅ. जितेंद्र आटोळे, डाॅ. सचिन घोळवे, डाॅ. सूरज भगत, डाॅ. हर्षल राठी, डाॅ.विक्रम शिरदाळे, डाॅ. अमर पवार,डाॅ. आनंद हारके, डाॅ. प्रितम ललगुणकर, डाॅ. भास्कर जेधे, डाॅ. वृषाली हारके आदी वैद्यकिय व्यावसायिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कोरोनाच्या काळात प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिक स्वत:च्या जिवाची पर्वा न करता काम करत आहे. अशावेळी होणाऱ्या हल्ल्यामुळे संबंधितांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत ठोस कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत बहुतांश डॉक्टरांनी व्यक्त केले.
प्रशासन सर्व डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी संबंधित आरोपीला अटक करुन तातडीने कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. सध्याच्या संकटकाळात प्रशासन आणि डॉक्टर एकत्रित काम करत आहेत. त्यामुळे डॉक्टर वर्गाने कोणतीही भीती न बाळगता आपले काम करत राहावे. प्रशासनाकडून या हल्ल्याबाबत योग्य ती कारवाई होईल. तसेच सध्याच्या संकट काळात नागरिकांनीही संयम राखून प्रशासन आणि कोरोना काळात लढणाऱ्या योद्ध्यांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
संबंधित हल्लेखोरावर यापूर्वीही गुन्हे दाखल असून आताही नव्याने गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे लवकरच त्याची तडीपारी करण्याबाबतचा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले. पोलिस प्रशासन डॉक्टरांच्या पाठीशी असून यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी विशेष पथक नेमले असल्याचेही त्यांनी नमूद केले.










