बारामती – महान्यूज लाईव्ह
शिवसेनेच्या फायरब्रॅण्ड नेत्या व सध्या राज्यभर महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शिंदे गटाला सळो की पळो करून सोडलेल्या सुषमा अंधारे यांना १८ वर्षानंतर आयुष्यात असा मोठा धक्का बसला की, ४५ जणांच्या त्यांच्या कुटुंबात एक नवे वादळ आले. ज्यासाठी बारामती सोडल्यानंतर त्या थेट मुंबईत गेल्या. बारामतीत असं काय घडलं की, अंधारे यांनी थेट मुंबई गाठली असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र त्यांच्या आयुष्यात १८ वर्षानंतर एक अशी घटना घडली, ज्याचा प्रवास बारामतीतून निघाल्यानंतर पहाटेच्या दीड वाजेपर्यंतच्या शोधमोहिमेनंतर संपला..!
यासंदर्भातील सर्व माहिती खुद्द सुषमा अंधारे यांनीच फेसबुकवर लिहून ठेवली. अंधारे या भातू-कोल्हाटी समाजाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने बारामतीत आल्या. बारामतीत त्या बराच वेळ थांबल्या. संपूर्ण अधिवेशन होईपर्यंत त्या थांबणारच होत्या, तेवढ्यात पाच वाजता त्यांना मुंबईतून कोणाचा तरी फोन आला. फोन घेतला आणि अंधारे यांच्या डोळ्यात पाणी आले.. त्यांनी तातडीने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. कारण काही तास, काही दिवस, काही आठवडे नाही, तर तब्बल १८ वर्षे जो भाऊ घरातून निघून गेला होता, त्याने त्यांना फोन केला होता..पण त्याचा फोनच नंतर बंद झाला आणि पुन्हा मनात शंकेची पाल चुकचुकल्याने त्या त्याला शोधण्यासाठी त्या मुंबईला निघाल्या..
सुषमा अंधारे यांनीच यासंदर्भातील माहिती दिली. त्या म्हणतात, आमचं संयुक्त कुटुंब आहे कुटुंबात तब्बल 48 माणसं आहेत. तब्बल 18 वर्षांपूर्वी आमचा भाऊ घरातून कुणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेला सुरुवातीला दोन-तीन दिवस तू कुठेतरी गेला असेल परत येईल असं वाटलं. अनेक ठिकाणी चौकशी केली. टीव्ही किंवा वर्तमानपत्रात हरवल्याची जाहिरात दिली तर त्याच्या जीवाला धोका होईल का अशी एक भाबडी भीती कुटुंबीयांना वाटत होती महिने उलटून गेले वर्ष उलटली पण तो काही परत आलाच नाही.
मध्ये दोन-तीन वेळा तो वेगवेगळ्या ठिकाणी असण्याची माहिती मिळाली कधी पुण्याचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या मदतीने त्याला सासवडमध्ये शोधायला आम्ही गेलो, तर कधी वाघोली खराडी पुणे स्टेशन किंवा कधी राज्याच्या बाहेर.. पण त्याचा काही पत्ता लागला नाही. परवा दिवशी गोरेगाव मध्ये शिव संवाद यात्रेची सभा झाली आणि बांद्रापासून गोरेगाव पर्यंत दूतर्फा सभेच्या निमित्ताने बॅनर्स झळकले.
कसे कुठून त्याच्या नजरेला हे बॅनर्स पडले आणि ही बॅनर वर असणारी व्यक्ती माझी बहीण आहे हे त्याने त्याच्या जवळच्या व्यक्तीला सांगितले. पण त्याच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार आणि विश्वास ठेवला तरी संपर्क कसा होणार. कारण घरातला जुना लँडलाईन नंबर आता इतिहासजमा झालाय.. फेसबुक आणि इतरत्र माझा संपर्क क्रमांक शोधायला सुरुवात झाली आणि मित्र यादीमध्ये माझा दुसरा भाऊ धनराज याच्या फेसबुक पोस्टवर संपर्क क्रमांक त्याला मिळाला.
त्याने स्वतःहून काल फोन केला. बारामतीचा मेळावा आटोपून पाच वाजता मी परतताना त्याचा फोन धडकला. मी मुंबईत आहे असे सांगितले. आम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये मुंबईकडे निघालो. पण नंतर मात्र फोन अचानक बंद झाला. वेगवेगळ्या शंका मनात येत होत्या अशा वेळेला मदतीला कोण असेल ? आणि जेव्हा कधी मदत मागायची कोणाला असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याचं उत्तर म्हणून एकच नाव पुढे असतं ते म्हणजे माननीय आमदार सचिन भाऊ आहिर. भाऊंना फोन केला . ज्या नंबर वरून त्याचा फोन आला होता लोकेशन ट्रॅक केलं. माहीम कोळीवाडा किंवा बांद्रे परिसरामध्ये मदत हवी आहे म्हटलं आणि भाऊंनी तात्काळ युवा सेनेच्या सगळ्या टीमला सांगितलं.
युवासेना उपसचिव जय सरपोतदार अरुण कांबळे ही मंडळी तात्काळ आपल्या टीम सह येऊन दाखल झाले राहुल कनाल यांनीही फोनवरून प्रत्येक गोष्टीचा आढावा घेणे सुरू ठेवला. साडेनऊ वाजता सुरू झालेले शोध मोहीम रात्री दीड वाजता थांबली माहीम कोळीवाडा बांद्रे पश्चिम जामा मस्जिद लिंक रोड के सी मार्ग फायर कॅम्प, मिठी नदीच्या कडेने आणि काल रात्री दीड वाजता आम्हाला अठरा वर्षांपूर्वी आमच्यापासून दुरावलेला भाऊ मिळाला.