प्रा. स्मिता पाटील
पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याना जोडणारा, जवळजवळ १९-२० गावांना वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असणारा डिकसळ पूल ज्या पुलाची निर्मिती १८५५ साली ब्रिटिशांनी केली. म्हणजे जवळजवळ १५० वर्षापूर्वी च्या या पुलाला शनिवार दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी भगदाड पडले. डिक्सळ पुलाची सध्याची दुरवस्था पाहून सावित्री नदीवरच्या पुलाची २ आगस्ट 2016 ची ती काळ रात्र डोळ्यासमोरून सर्रकन गेली… कारण तोही असाच ९० वर्षापूर्वीचा जुना पूल… पूल बांधणाऱ्या ब्रिटिश सरकारने पुलाची मुदत संपली आहे, तो पूल वाहतुकीस योग्य नाही, असे कळविले होते. स्थानिक पत्रकार, नागरिक या सर्वांनीच पूल धोकादायक आहे, अखेरच्या घटका मोजतोय…. फार मोठी दुर्घटना होऊ शकते अशा आशयच्या दिलेल्या इशाऱ्याकडे ही सरकारी यंत्रणेने अनास्था दाखवून दूर्लक्ष केले. त्यामुळेच मंगळवार दि. २ ऑगस्ट २०१६ रोजी रात्री अकरा -साडे अकराच्या दरम्यान सावित्री नदीच्या महापुरात पुलाने जलसमाधी घेतली. या दुर्घटनेत दोन एसटी बस आणि ८ खाजगी वाहने सावित्रीच्या महापुरात वाहून गेली आणि मग मात्र सरकारला जाग आली. नंतर सरकारने पूल बांधला. मात्र एखादी घटना होईपर्यंत सरकार शांत का बसते? आताही तशीच काहीशी दुरवस्था १५० वर्षांहून जुना असलेल्या या डिक्सळ पुलाची झालेली आहे.
कारण शासनाने पुलाच्या दोनही बाजूला हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद आहे, असे सुचना फलक लावलेत. दोन्हीही साईडला बॅरीकेटही लावले मात्र इथेच शासनाचे काम संपले का? कारण जसा डिक्सळ ते करमाळा रोड चांगला झाला, तशी जास्त रहदारी, प्रचंड अवजड वाहने या पुलावरून आजपर्यंत जात होती. मध्ये सरकारने पूल दुरुस्ती करून घेतली. महिन्यातच जड वाहतुकीमुळे पुलावर खड्डे पडले. दगडही निखळले. परत शासनाने गेल्या ३-४महिन्यात जाड अशी बॅरिकेट लावले.
अज्ञातांनी रात्रीत बॅरिकेट तोडून त्या पुलावरून जड वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू केली. परिणामी १४ जानेवारीला पुलाला भगदाड पडले आणि १९-२० गावातील नागरिकांवर संक्रांत आली. सोलापूर हद्दीत जिथे पूल संपतो, तिथे शासनाने खड्डा खणला. दोन चाकी जाऊ शकेल एवढीच जागा ठेवली. तर भिगवण कडून डिकसळ गावात लोखंडी गेट आडवे लावले मध्ये मातीचे ढिगारे आडवे टाकले.
पुलाला भगदाड पडल्यापासून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले पण जीवनावश्यक गोष्टी आणण्यासाठी भिगवण, बारामती याठिकाणी नागरिकांना जीव मुठीत घेऊन दोन चाकीने प्रवास करावा लागत आहे. कारण ३०-४० किलोमीटर चा वळसा घालण्याची वेळ नागरिकांवर येत आहे, त्यामुळे भिगवण, बारामती येथे नोकरी करणारे नागरिकांना पुलावरचा १० किलोमीटरचा प्रवास जवळचा आणि बरा वाटतो.
या अवस्थेमध्ये ३-४ दिवस नियमांचे पालन झाले. पण ५ व्या दिवशीच भिगवण कडून एक चार चाकी व दोन रिक्षा पुलावर दिसल्या, परंतु त्यांना सोलापूर हद्दीत खड्ड्यामुळे प्रवेश करता नाही आला. त्यामुळे शासनाने कडक पोलीस बंदोबस्त लावावा. अन्यथा हा पूल दोन चाकी साठी सुद्धा येत्या पावसाळ्यात धोकादायक होऊ शकतो याचा दूरदृष्टी ने नागरिकांनी विचार करावा. गेली ४० वर्ष येथील नागरिक नवीन पुलाची मागणी करत आहे.
परंतु प्रशासन या असुरक्षित बनलेल्या पुलाला नवीन पूल बांधण्याची उपाययोजना कधी करेल?हा फार मोठा प्रश्न आहे. गेली कित्येक वर्षे येथील नागरिक फक्त ऐकतो आहे की सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे, पण प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार असा प्रश्न प्रत्येक नागरिकाला भेडसावत आहे. आजच्या डिजिटल इंडियात आमच्या या ग्रामीण भागाकडे शासनाचे लक्ष एखादी दुर्घटना झाल्यावरच जाणार की काय असे वाटते.