दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
विद्यार्थ्यांना बाह्यजगातील व्यवहारज्ञानाचे धडे मिळावे या उद्देशाने पाचगणी येथील विद्यानिकेतन हायस्कूल पाचगणी येथील विद्या मंदिरात चिमुकल्यांनी भाजी बाजार भरवला होता.
पाचगणीतील विद्या निकेतन हायस्कूल ही महाराष्ट्रातील एक उत्तम बोर्डिंग( निवासी) स्कूल म्हणून नावारूपाला आलेली अग्रगण्य संस्था आहे. सी.बी.एस.ई व एस.एस.सी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये सर्वोत्तम क्षमता आणण्याच्या उद्देशाने संस्था निसर्गाचे वरदान असणाऱ्या पाचगणी येथे सर्वोत्तम शिक्षण देत आहे.
प्राथमिक पायाभूत शिक्षण घेत असताना हल्लीच्या आधुनिक तंत्रज्ञान व स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या अंगी विविध प्रकारचे कौशल्य वाढवण्याच्या हेतूने हा भाजीबाजार भरविण्यात आला.
या भाजी बाजारामध्ये चेरीबेरी अर्थात प्ले ग्रुप, जुनिअर केजी, सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . विद्यालयामध्ये दुपारी बारा ते दोन या वेळेत हा भाजीबाजार भरवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी भाज्या, फळे व इतर भाजीपाला विक्रीसाठी आणला होता.
या
उपक्रमामुळे मुलांनी भाजीची खरेदी विक्री कशी करावी, आर्थिक व्यवहार कसा करावा, याचे व्यवहार ज्ञान मिळावे हा मुख्य उद्देश विद्यालयाच्या भाजी बाजार भरवण्याचा होता, असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती बिरामणे यांनी केले.
या उपक्रमामध्ये शाळेच्या शिक्षिका रेश्मा, विजया जाधव, सपना इंगळे, सुनीता खुडे यांनी सहभाग घेतला. या उपक्रमात पालकांनीही उत्स्फुर्त सहभाग घेतला.