इंदापूर – महान्यूज लाईव्ह
कुरवली येथे महावितरणमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या गणपत बेले या वायरमनचा वीजेचा धक्का बसून १८ जुलै २०२२ रोजी मृत्यू झाला होता. त्या प्रकरणातील सखोल तपासाअंती हा मृत्यू दोन शेतकऱ्यांनी बेकायदेशीररित्या दोन वीजजोड दुसऱ्या रोहित्रातून घेतल्याने रिटर्न करंट बसल्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात २१ जानेवारी २०२३ रोजी महादेव पांडूरंग कदम व बुवासाहेब गेणूजी कदम (दोघे रा. कदमवस्ती, कुरवली ता. इंदापूर) यांच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ही घटना १८ जुलै २०२२ रोजी झाली होती. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील रहिवासी गणपत बेले हे इंदापूर तालुक्यातील तावशी येथील महावितरणच्या शाखेत कामास होते. सन २०१७ पासून काम करताना शेतकऱ्यांशी असलेल्या आपुलकीने त्यांनी अनेक शेतकरी जोडले होते.
मात्र १८ जुलै रोजी खंडीत वीजपुरवठ्याची माहिती मिळाल्याने त्यांनी कुरवली गाव गाठले. तेथे माहिती घेतल्यानंतर अगोदर घोलपवाडी येथील फिडरवरील वीजपुरवठा बंद केला. मात्र तरीही त्यांना वीजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्या्ंना मोठा धक्का बसला.
मात्र येथे माहिती घेतल्यानंतर महादेव कदम व बुवासाहेब कदम यांनी त्यापूर्वीच कदमवस्ती व कदममामा विद्युत रोहित्रावरून बेकायदेशीररित्या अन्य एक वीजजोड घेऊन एकीकडील वीजपुरवठा बंद असेल, तर दुसऱ्या फीडरवरून वीजपंप सुरू ठेवण्याचा जुगाड केला होता. त्यामुळेच रिटर्न करंट येऊन बेले यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष तपासातून निघाला.
त्यामुळे बेले यांचे वडील राघोजी बेले यांनी वरील दोघांविरोधात फिर्याद दिली, त्यावरून वालचंदनगर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास वालचंदनगर पोलिस करीत आहेत.