बारामती – महान्यूज लाईव्ह
सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत तब्बल ४७ लाख ३० हजार रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात गेली १६ महिने फरार असलेल्या रंजना प्रकाश होले, महेश मारुती जाधव, चंद्रकांत तुकाराम नवले, गणेश गंगाराम बनकर व गंगाराम मारुती बनकर यांनी बारामतीच्या अतिरिक्त् जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता.
बारामतीचे जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायाधिश एस.एस. पल्लोड यांच्यापुढे या अटकपूर्व जामीनाची सुनावणी झाली, यामध्ये सरकारी वकील अॅड. सुनील वसेकर व संस्थेच्या वतीने अॅड. ज्ञानेश्वर माने यांनी युक्तिवाद केला.
त्यांनी जामीन अर्जास विरोध करताना पाचही आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग, अपहार केलेली मोठी रक्कम व सभासदांच्या हिताचा व ठेवीदारांच्या आर्थिक नुकसानीचा विचार करून अटकपूर्व जामीन देऊ नये अशी मागणी केली. तपास अधिकारी फौजदार योगेश शेलार यांनीही अटकपूर्व जामीनास विरोध कला.
यानंतर बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हे सर्व संशयित आरोपी संस्थेच्या सचिवाचे निकटवर्तीय आहेत, त्यामुळे या प्रकरणात अनेक खातेदारांचे आर्थिक नुकसान झाले असल्याकारणाने याचा तपास होणे जरुरीचे आहे आणि त्यांना अटकपूर्व जामीन देण्याची कोणतीही सबळ कारणे नसल्याने त्यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.