पुणे महान्यूज लाईव्ह
पुण्यातील महापालिकेत कचरावेचक म्हणून काम करणाऱ्या अक्षय भिसेची हत्या झाली आणि पुण्याच्या पोलिसांना एका थंड ड़ोक्याने खून केलेल्या आरोपीचा शोध घेण्याची वेळ आली.. दृश्यम स्टाईल झालेल्या या खूनाचा उलगडा पुण्याच्या बहाद्दर पोलिसांनी केला आणि काहीही कारण नसताना जिवानिशी गेलेल्या अक्षयबरोबर त्याच्या पत्नीच्याही संसारात मिठाचा खडा पडला..
पुण्यातील अक्षय भिसे याच्या पत्नीचे कर्नाटकातील बिदर येथील रहिवासी असलेल्या आरोपी संतोष शिंदे याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र लोणीकाळभोर येथे राहत असलेल्या अक्षयशी लग्न झाल्यानंतर त्याच्या पत्नीने संतोष शिंदेशी संबंध तोडले. ती त्याचे फोन टाळू लागली, तसेच त्याच्या संपर्कात राहीली नाही. केवळ तिचे लग्न झाले म्हणूनच ती आपल्याला भेटत नसल्याचा राग संतोष शिंदे याला आला.
त्याने अक्षयला जगातून संपवले, तर पुन्हा एकदा आपली प्रेयसी आपली होईल या अपेक्षेने त्याने थंड डोक्याने अक्षयच्या खूनाचा प्लॅन रचला. अगदी त्याने या खूनासाठी क्राईम पेट्रोल, दृश्यम सारखे चित्रपट व मालिका पाहिल्या. २१ ऑगस्ट रोजी त्याने खूनाचे नियोजन केले.
या दिवशी जेव्हा अक्षय हा कामावर निघाला, तेव्हा त्याचा दुचाकीवरून पाठलाग करून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी वर्मी लागून अक्षयचा मृत्यू झाला. यानंतर पुणे पोलिसांनी तपास हातात घेतला. मात्र पोलिसांना आरोपी लक्षात येत नव्हता.
आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये किंवा ही हत्या सहजासहजी कोणालाच समजू नये यासाठी एकाच दिवसात संतोष शिंदे याने तीन वेळा पेहराव बदलला. मात्र तांत्रिकदृष्ट्या तपास करीत व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिस संतोष शिंदेपर्यंत पोचले आणि त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीत या हत्येमागील प्लॅन पोलिसांना मिळाला..