राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यासह जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अनाधिकृत चार शाळांना दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांनी कुलूप ठोकले. या शाळेतील संस्थांवर लाख रुपये दंडात्मक कारवाई ही करण्यात आली आहे. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांनी दिली.
दरम्यान, शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा उघड झाला असून आपली संस्था वाचवण्यासाठी व दंडाची रक्कम कमी करण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यासाठी संस्थाचालकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.
दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील जिजाऊ एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या अभंग शिशुविहार बालविकास ज्ञान मंदिर ही शाळा सन २०१६ पासून अनाधिकृतरित्या चालू होती. चालू वर्षी या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत ४१ विद्यार्थ्यांची पटसंख्या होती. ह्या शाळेतील धक्कादायक बाब अशी की, या शाळेतील विद्यार्थी हे शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा (घोलपवाडी) येथील एंजल ग्लोबल स्कूल येथे दाखल करून शिक्षण घेत आहेत. या शाळेला एक लाख रुपयाचा दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
तसेच कासुर्डी येथीलच सौ. प्रतिभाताई गायकवाड प्रतिष्ठान या संस्थेचे क्रेयाॅन्स इंग्लिश प्राइमरी स्कूल या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत ७० विद्यार्थी पण संख्या असून या शाळेतील विद्यार्थी हे ही शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील वाघेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत दाखल आहेत. असे तपासात समोर आले असून या संस्थेवरही एक लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
दौंड शहरातील बालाजी नगर येथील प्रभाकर एज्युकेशन सोसायटी या संस्थेची ज्ञानप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल ही संस्था चालू वर्षी म्हणजे जून २०२२ पासून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत अनाधिकृतरित्या सुरू होती. तसेच या संस्थेने प्राथमिक व माध्यमिक ह्या दोन्ही शाळा अनाधिकृतरित्या श्री मंगेश स्कूल ह्या ठिकाणी स्थलांतरित केली. त्यामुळे या संस्थेवर अकरा लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी भुजबळ यांनी दिली.
दरम्यान, कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने शाळांना ऑनलाईन शिक्षण घेण्याचे आदेश दिल्याने बहुतांश सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले. हीच नामी शक्कल लढवत ह्या अनधिकृत शाळांनी आमचे संस्था बंद नसून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्याचे पालकांना सांगून पालकांचे दिशाभूल करीत असल्याचे प्रकार सुरू आहे.
आपल्या संस्थेवरील कारवाई टाळण्यासाठी दौंड सह व जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांना पुढे करून शिक्षण अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करीत असल्याचे चित्र सध्या अवलंबले जात आहे. शिक्षण क्षेत्रात राजकीय, व्यापारी व उद्योजक यांनी केलेला प्रवेश हा विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत असून शिक्षण क्षेत्र हे या लोकांचा पैसा कमवण्यासाठी एक व्यवसाय झाला आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्र हे बदनाम होत आहे. कारवाई झालेल्या काही संस्थांमध्ये राजकीय लोकांची भागीदारी आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सुरू असलेला हा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
या कारभारामुळे दौंड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कारवाई केलेल्या या अनाधिकृत संस्था व शाळांना पुन्हा शासनाने परवानगी देऊ नये अशी मागणी पालकांकडून होत आहे. तर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत दाखल करण्यापूर्वी त्या शाळेला शासनाची परवानगी आहे का? याबाबत माहिती घेऊन आपल्या पाल्यांना शाळेत दाखल करावे असे आवाहन शिक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.