राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
13 जुलै म्हणजे उद्या राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व गट व सर्व तालुक्यांच्या पंचायत समितीच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिले होते. मात्र आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट सूचना दिल्या असून उद्या होणाऱ्या नियोजित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीला स्थगिती देण्यात आली आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणा संदर्भात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 92 नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात नकार दिला असला, तरी येथे 19 जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर विशेष अनुमती याचिकेत सरकारने दाखल केलेल्या अर्जावर एका आठवड्यानंतर सुनावणी होणार असल्याने आयोगाने पाच जुलै 2022 रोजी आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमासंदर्भात दिलेला आदेश तूर्तास स्थगित करण्यात येत आहे.
या संदर्भात सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम लवकरच देण्यात येईल अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे सचिव किरण कुरुंदकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा व गोंदिया हे जिल्हे वगळण्यात आले आहेत.