मुंबई : महान्यूज लाईव्ह
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे तेरा आमदारांसह सुरतला जाऊन पोहोचल्याच्या बातम्या सकाळी सकाळी थडकल्या आणि इकडे राज्यातील महाविकास आघाडीच्या समर्थकांना घाम फुटला. गुजरातमध्ये तर शिवसेनेचे आमदार गेले, पण इकडे आपले आमदार कुठे याची चौकशी करण्यासाठी अगदी सहजच गावोगावचे बाबुराव आपल्या तालुक्यातील आमदारांना फोन करू लागलेत.
अगोदर शिवसेनेचे 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह नॉटरिचेबल झाल्याची बातमी आली आणि त्या पाठोपाठ आमदारांचा आकडा वाढत चालला. काही वेळानंतर 25; काही वेळानंतर 37 अशी आमदारांची संख्या वाढत गेल्यानंतर तिकडे महाविकास आघाडीशी संबंधित राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना देखील मुंबईत फोन होऊ लागले.
आपले आमदार आपल्या पक्षातच आहेत का आणि त्यापेक्षा खरोखरच ते घरी आहेत का? याची चाचपणी अगदी सहजरित्या गावोगावचे कार्यकर्ते करू लागल्याने आमदारांना देखील वैताग आला. विशिष्ट शिवसेनेच्या इतर मतदार संघातील देखील कार्यकर्ते ही चटणी करताना आज सकाळपासून दुपारपर्यंत देत असल्याची चर्चा सूत्रांनी दिली.
अगदी सहज फोन केला होता; विशेष काही नव्हते; इथपासून ते उगीच काहीतरी काम सांगायचे म्हणून मतदारसंघातील काम सांगत आपल्या आमदारांविषयी काही कार्यकर्ते चाचपणी करत होते. तिकडे महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित असल्याने अस्वस्थ असलेल्या वातावरणात या वेगळ्याच चर्चेने काही काळ गंमत आणली.