इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालूक्यातील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे समजले जाणा-या निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेले कोविड सेंटरचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने, बारामती विभागाचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, अधिक्षक डॉ एकनाथ चंदनशिवे, डॉ.अरविंद आरकिले, डॉ.सुहास शेळके, डॉ.सविता पोमणे, ग्रामसेवक अमोल मिसाळ व आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. इंदापूर तालुक्यात सर्व डॉक्टरांना त्याबाबतच्या योग्य सूचना दिल्या आहेत. आणि सूचनांचे योग्य पालन करुन प्रत्येक रुग्णाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. योग्य उपचार केले जातील.
या बाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद आरकिले यांनी महान्यूज लाईव्हला सांगितले की, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामीण रुग्णालयात २० बेडची सोय करण्यात आली आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत.ऑक्सिजनची कमतरता ही कोरोना रुग्णांला भेडसावणारी मुख्य समस्या आहे.त्यामुळे येथील प्रत्येक बेडला रुग्णास ऑक्सिजन पुरवणारी यंत्रणा जोडण्यात आली आहे. ऑक्सिजनची सुविधा नजीकच्या काळात सुरु होईल. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सेवा देण्यासाठी तज्ज्ञांची गरज असते. त्यासाठी शासनस्तरावरुन सोय करण्यात येणार आहे.
या भागातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी निमगाव केतकी,वरकुटे खुर्द,गोतोंडी व परिसरातील खाजगी डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे.उपलब्ध डॉक्टरांच्या संख्येनुसार त्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.एक दिवस ड्युटी केल्यावर आठ दिवसांची विश्रांती डॉक्टरांना देण्यात येणार आहे. या काळात त्यांना पुरेशी विश्रांती मिळेल याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.










