दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे मागील तीन दिवसात कोरोना ने तीन जणांचा बळी घेतला आहे.
एक ३५ वर्षीय महिला व दोन पुरूषांचा यामध्ये समावेश आहे अशी माहिती पाटस प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी दिली. पाटस येथे १७ जुलै रोजी कोरोनाने ६० वर्षीय जेष्ठ व्यक्तीचा पहिला बळी घेतला होता, त्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या पाटस मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला. कोरोना बाधीत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तिंना लागण झाली. एकाच भागात सहा दिवसात सहा रूग्ण सापडले, त्यानंतर एक एक संख्या वाढत गेली, खासगी रुग्णालय व शासकीय रुग्णालयातील अहवाल पॉझिटिव्ह येवू लागले.
पाटस मध्ये आतापर्यंत तब्बल २१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या यातील १७ जणांनी कोरोनावर मात केली आहे, मात्र मागील तीन दिवसात कोरोनाची लक्षणे असलेले रूग्ण वाढत आहेत. यामधील अंबिकानगर भागात राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने पुणे येथील ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र ६ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला, मृत्यूनंतर त्याचा अहवाल पाँझिटिव्ह आला, तर ग्रामपंचायत कार्यालय समोर रहिवासी असलेल्या ७० वर्षीय जेष्ठास त्रास होऊ लागल्याने त्यांना शासनाने कोवीड सेंटर म्हणून ताब्यात घेतलेल्या योगेश्वरी रूग्णालयात दाखल केले. त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला व त्याचा ७ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. तर भागवत वाडी परिसरातील एका ३५ वर्षीय महिलेला ही त्रास होऊ लागल्याने तिला हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तिचा ९ ऑगस्ट ला रात्री मृत्यु झाला.
मागील तीन दिवसात तीन जण कोरोना मुळे दगावले आहेत. तीन दिवसात तीन जणांचा बळी कोरोनामुळे गेला, मात्र तरीही पाटस मध्ये सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा आहे. पुणे सोलापूर महामार्गाच्या पुलाखाली कारखाना चौकात भाजीपाला खरेदी विक्री करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे, कापड दुकान व इतर दुकानात ही तशीच परिस्थिती पहायला मिळत आहे.











