दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे सोमवारी भरलेल्या आठवडे बाजारात खरेदीसाठी नागरीकांची अक्षरश: झुंबड उडाली. त्यामुळे एकीकडे ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच पाटसच्या बाजारामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे शासनाच्या कोणत्याच नियमांचे या बाजारात पालन केले गेले नाही. तरीही या प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाटसमध्ये आतापर्यंत १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील सातजण कोरोनामुक्त झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरीत सात रुग्ण उपचार घेत आहेत. पाटसमध्ये कोरोनाची भयानक परिस्थिती असतानाही नागरीकांमध्ये कसलीच धास्ती नसल्याचे दिसून येत आहे. संबंधित कोरोनाग्रस्त भाग प्रशासाने प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. मात्र या परिसराच्या अवघ्या ५०० मीटर अंतरावर आठवडी बाजार भरला आहे. विशेष म्हणजे, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनीही खरेदीसाठी गर्दी केली होती.
अत्यावश्यक व जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. परंतु त्यासाठी नियम आणि अटी घालून देण्यात आल्या आहेत. पाटसमध्ये सर्रास या नियमांचे उल्लंघन केले जात असून आजच्या आठवडी बाजारात तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. एकीकडे प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र नागरिकांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याने पाटसमधील कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होवू लागला आहे.










