बारामतीतील कोरोना हेल्पलाईन आठवड्यात तिसऱ्यांदा ठरली देवदूतासाठी लाईफलाईन…
बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोना आता कोणी मोठा, छोटा असे काही पाहत नाही, तो कोणालाही होतो आणि कोणालाही तो काळाच्या पडद्याआड घेऊन जातो हे आपण पाहतो आहोतच..याच कोरोनाच्या काळात बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रेरणा घेऊन सुरू झालेली कोरोना हेल्पलाईन अगदी गोव्यातील कुटुंबांना देखील आधार देऊ लागली आहे हेही एव्हाना सगळ्यांनाच माहिती झाले आहे, मात्र काल चाळीस वर्षे वैद्यकीय सेवा केलेल्या ज्येष्ठ डॉक्टरांना देखील उपचारासाठी बारामतीची कोरोना हेल्पलाईन ही लाईफलाईन ठरली. अत्यंत क्लिष्ठ असलेल्या परंतू कोरोना निगेटिव्ह झालेल्या ज्येष्ठ डॉक्टरांसाठी शनिवारचा बारामतीकरांचा दिवस अहमदनगर – पुणे या प्रवासाभोवती केंद्रीत झाला…अखेर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर दवाखान्यात त्या डॉक्टरांना जागा मिळाली आणि फक्त जागाच नाही, उपचारही वेळेत सुरू झाले..
बारामतीतील कोरोना हेल्पलाईनमधील भूलतज्ज्ञ डॉ. सुजीत अडसूळ, डॉ. संतोष चाकूरकर यांच्या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कर्जत-जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी दिलेल्या पाठबळामुळे शनिवारचीही एक मिशन लाईफलाईन यशस्वी झाली. गेली चाळीस वर्षे कर्जत आणि परिसरामध्ये वैद्यकीय सेवा देणारे ज्येष्ठ डॉक्टर गेल्या पंधरा दिवसापासून अहमदनगर येथील एका सुसज्ज हॉस्पिटलमध्ये अतीदक्षता विभागात कोरोना च्या उपचारासाठी दाखल झाले होते. उपचारांना योग्य सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच कधीही काही गोष्टी वर-खाली होत होत्या. डॉक्टरांचे पथक त्यांच्या तब्येतीवर सतत नजर ठेवून होते.आणि कोरोना साठी लागणारी रेमेडेसिवीर आणि इतर इंजेक्शन त्यांना देण्यात आली होती. ह्या उपचारांच्या कालावधीमध्ये कर्जत परिसरातील सर्व नागरिक आपल्या डॉक्टरांसाठी प्रार्थना करत होते. कर्जत शहर डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. राम तोरडमल हे रोज डॉ. गोपाळ बहुरूपी यांच्या शी चर्चा करत होते. डॉ.मंदार काळदाते हे सर्व अपडेट्स आदरणीय आमदार रोहित दादा पवार यांना देत होते. परंतु दुर्दैवाचा फेरा संपला नव्हता उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकातील काही सदस्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आणि मग तर खूप अडचण तयार झाली. अहमदनगर मधील डॉक्टर गोपाळ बहुरूपी हे त्यांचे बारामतीमधील मित्र डॉक्टर संतोष चाकूरकर यांच्या संपर्कात होते, तेथून ही माहिती मूळचे कर्जतचे, परंतू सध्या बारामतीकर असलेले डॉ. सुजीत अडसूळ यांना मिळत होती.
अशातच संबंधित डॉक्टरांवर उपचार करणाऱ्या पथकातील डॉक्टर सदस्यच कोरोना संक्रमित झाल्याने पुढील उपचारांना मर्यादा व अडथळे येऊ शकतात अशी भीती निर्माण झाली, परंतू त्या ज्येष्ठ डॉक्टरांचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यातल्या त्यात ती एक चांगली गोष्ट होती. त्यामुळे त्यांना पुणे येथील दीनानाथ हॉस्पिटल मध्ये दाखल करायचे ठरले होते. मात्र त्यांना पुण्याला नेण्यासाठी जास्त फ्रिक्वेन्सी असलेल्या व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. कारण अहमदनगर ते पुणे या प्रवासासाठी नेहमीच्या कार्डिअँक अँब्युलन्स मध्ये असणारा व्हेंटिलेटर या केस मध्ये उपयोगाचा नव्हता व पेशंटला जास्त क्षमतेने व्हेंटिलेशन चालू होते. मग जास्त फ्रिक्वेन्सी देणारा व जास्त दाब तयार करून ठेवणारा व्हेंटिलेटर उपलब्ध करून तो पुण्यातील कार्डिअँक अँब्युलन्स मध्ये
बसवण्यात आला. त्याच्या टेस्ट पुण्यामध्ये करण्यात आल्या. हे सारे सोपस्कार कसेबसे पार पाडेपर्यंत दुपार झाली होती व प्रत्येक गोष्टीत डॉ. सुजीत अडसूळ यांचा फॉलोअप सुरूच होता. एवढे दिव्य पार पडल्यानंतरही रुग्णासाठी बेड उपलब्ध नव्हते, त्यातच ते नॉनकोविड अतिदक्षता विभागात हवे होते. जे उपलब्ध नव्हते. अशावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे, आमदार रोहितदादा पवार यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवत डॉ. अडसूळ यांनी पाठपुरावा सुरू ठेवला. अजितदादांच्या सूचनेनुसार दीनानाथ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागाचे तज्ञ डॉक्टर प्रसाद राजहंस यांच्याशी पाठपुरावा करताना डॉक्टर प्रसाद यांनीही ही तत्परतेने हॉस्पिटल मधील सर्व संसाधनांचा उपयोग करून नॉन कोविड अथिदक्षता विभागात एक बेड तयार केले आणि डॉक्टर सुजीत अडसूळ यांना निरोप दिला. या दरम्यान आमदार रोहितदादा पवार हे सातत्याने संपर्कात राहून मदत करीत होते आणि रात्री नऊ वाजता अहमदनगर येथील ते ज्येष्ठ डॉक्टर पुण्यात पोचले आणि त्यांच्यावर उपचारासही सुरवात झाली…आणि अशा रितीने एखाद्या मालिकेतील एक भाग संपावा, तसे बारामतीच्या कोरोना हेल्पलाईनच्या आजच्या मदतकार्याचा अध्याय सुफळ संपूर्ण यशस्वी झाला…!











Great work.God bless all of you.
Very good
Thank God
डॉकटर काकडेंच्या वतीने सर्वांचे हार्दिक आभार
Amazing work my best compliments to all of you