आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका डोळ्यासमोर ठेवून तर हा खटाटोप!
राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : पुणे महानगरपालिकेची पीएमपीएल बस येत्या गुरुवारपासून पाटस आणि कुरकुंभ पर्यंत धावणार आहे मात्र ती धावण्यापुर्वीच ही बस आमच्याच मुळे सुरू झाली आहे असे दावे प्रतिदावे आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाने केला आहे. बसचे श्रेय लाटण्यासाठी सोशल मीडियावर कुल – थोरात गटात श्रेयवाद चांगलाच पेटला आहे.
सोमवारी महान्यूज ने कुरकुंभ व पाटस पर्यंत पुणे महानगर परिवहन मंडाळाची पीएमपीएलची बस गुरूवारी म्हणजे 24 फ्रेबुवारी पासून धावणार आहे. माजी आमदार रमेश थोरात यांच्या प्रयत्नांना यश अशी बातमी प्रसिद्ध केली. ही बातमी प्रसिद्ध होताच माजी आमदार रमेश थोरात आणि आमदार राहुल कुल गटाचे कार्यकर्ते सोशल मीडियावर दावे प्रतिदावे करत भिडले.
पाटस आणि कुरकुंभपर्यंत बस सुरू करण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. ते पत्र सोशल मीडियावर फिरवत कुल यांच्या प्रयत्नांमुळे ही बस सुरू होणार आहे असा प्रतिदावा कुल यांच्या समर्थकांनी केला आहे.
तर माजी आमदार रमेश थोरात, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी सातत्याने अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन पत्रव्यवहार करून ही बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केला आहे यामुळेच ही बस सुरू झाली आहे. यामुळे कुल यांच्या एका पत्रावर ही बस सुरू झाली नाही असा दावा थोरात यांचे समर्थक करीत आहेत.
कालपासुन सोशल मीडियावर या दोन्ही गटांमध्ये श्रेय लाटण्यासाठी वाद चांगलाच पेटला आहे. येथे अजून बसचाच पत्ता नाही, ती खरंच गुरुवारपासून सुरू होईल का नाही याची अजून खात्री नाही. मात्र आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्या आहेत.
त्यामुळे आमच्यामुळेच ही बस सुरू झाली आहे असे दावे केले जात आहेत. हे दावे – प्रतिदावे पाटस आणि कुरकुंभ परिसरातील नागरिकांचे समाधान करण्यासाठी तर दोन्ही गटांचा तर प्रयत्न केला जात नाही ना अशी ही चर्चा रंगली आहे, तर कोणामुळे का बस सुरू होईना, पण ती लवकर सुरू करा असे मत सर्व सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.