बारामती : महान्यूज लाईव्ह
गेले काही दिवस दररोज सकाळी कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले अशी ऐकण्याची सवय झालेल्या बारामतीत कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील निकटच्या ४४ संशयितांपैकी ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर गेले काही दिवस दररोज सकाळी पॉझिटिव्ह दिसणारी कोरोनाग्रस्तांची यादी किमान सकाळी तरी आढळली नाही, अर्थात अजून 14 जण प्रतीक्षेत आहेत, मात्र बारामतीतील कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी जे संशयित कोरोनाच्या चाचणीमध्ये निगेटिव्ह आले आहेत, त्यांनी सक्तीने 14 दिवस क्वारंटाईन होण्याची गरज आहे.
बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, हे कोरोनाचे रुग्ण शहरासह तालुक्याच्या विविध भागात आढळत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. वास्तविक पाहता कोरोना ची साखळी तुटावी याकरीता बारामतीत सुरुवातीच्या काळात वेगवेगळे व परिणामकारक प्रयोग करण्यात आले, त्याचा अपेक्षित परिणामही दिसून आला. त्यातून दोन बारामती कोरोनामुक्त झाली, परंतु नंतरच्या काळात अनलॉक एक नंतर पुणे आणि मुंबईतून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आणि पुन्हा एकदा बारामतीला कोरोना ने विळखा घातला. सध्या दररोज 40 लोकांपेक्षा अधिक संशयित कोरोना ग्रस्तांचे नमुने तपासले जात आहेत बारामतीत नेहमीच नवनवीन प्रयोग यशस्वी झाले आहेत त्याचा विचार करता व पुन्हा एकदा रोगमुक्त बारामती करण्यासाठी कठोरपणे स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे.
हे का?
विशेष म्हणजे आठ दिवसापूर्वी ज्या युवकाच्या तपासणीत तो पॉझिटिव्ह आला, त्याच्या संपर्कातील निकटच्या लोकांचे नमुने निगेटिव्ह आले होते, मात्र आठ दिवसानंतर त्याच निकटच्या लोकांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत ही घटना सर्वांना विचार करण्यासाठी पुरेशी आहे.
अंगावर दुखणे काढू नका
बारामतीतील काही कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूमध्ये उशिरा दवाखान्यात दाखल होणे हे प्रमुख कारण आढळून आलं आहे. वेळेत निदान झाल्यास योग्य ती काळजी घेता येणे शक्य होते, संपर्काचाही धोका कमी होतो.थंडी वाजून येणे, ताप कमी न होणे, घसा खवखवणे, यासारखी लक्षणे दिसल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांचा तातडीने सल्ला घ्या असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.










