दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईच्या एमआयडीसीतील चांदणी चौकात अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या टपऱ्यांमध्ये अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाई पोलिसांनी अचानक झाडाझडती घेतली आणि तब्बल १ किलो गांजा आढळून आला.
एम.आय.डी.सी.वाई येथे पानटपरीमध्ये गांजा विक्री करणार्या रोहन शंकर सुर्यवंशी ( वय ३५, रा. बोपर्डी, ता. वाई ) याला पोलीसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ९६० ग्रॅम विक्री करीता आणलेला गांजा हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी एमआयडीसीतील चांदणी चौकात केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान येथे सुरु असलेले अवैद्य धंदे रोखण्यासाठी वाईच्या पोलिसांची करडी नजर असणार आहे. अशा बेकायदेशीर व्यवसायीकांना तडीपार करण्यासाठी वाई पोलिस ठाणे योजना आखत असल्याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिली
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना माहिती मिळाली की, चांदणीचौक एम.आय.डी.सी. वाई येथे असलेल्या निनावी पानटपरीमध्ये एक इसम बेकायदेशीररित्या गांजा या अमली पदार्थाची विक्री करीत आहे.
त्यानंतर बाळासाहेब भरणे व गुन्हे प्रकटीकरण
विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी मिळालेल्या माहीतीनुसार या पानटपरीवर छापा टाकला.
तेव्हा ६ हजार रुपये किमतीचा सुमारे ९६० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळाला तो जप्त करण्यात आला. यासंदर्भात वाई पोलीसांनी
गुन्हा दाखल करून रोहन शंकर सुर्यवंशी याला अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सूर्यवंशी याला १५ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील तपास बाळासाहेब भरणे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब भरणे, सहायक निरीक्षक रविंद्र
तेलतुंबडे, सहाय्यक फौजदार विजय शिर्के, महीला पोलीस नाईक सोनाली माने, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर यांनी केली.