दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरात वेगवेगळ्या भागात एकाच रात्रीत दोन तरुणांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तरूणांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दौंड पोलीस ठाण्याचे ठाणे अमलदार मारुती सूळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड शहरात रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सरपंचवस्ती परिसरातील दत्तकला पार्क येथील विशाल विजयसिंह पाटील (वय २५) या तरुणाने घराच्या टेरेसवरील खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत मयत विशालचा भाऊ उदयसिंह विजयसिंह पाटील यांनी दौंड पोलीस येथे खबर दिली.
तर दुसऱ्या घटनेमध्ये शहरातील जनता कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेल्या अझर इमाम शेख (वय ३४) या तरुणाने बेडरूममध्ये ओढणीच्या साह्याने रात्री दोन वाजण्याच्या आसपास गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अझर याचा भाऊ इम्रान इमाम शेख यांनी फिर्याद दिली आहे. शहरात एकाच रात्रीत दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे शहर हादरले असून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या दोन्ही तरुणांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.










