बारामती महान्यूज लाईव्ह
वडगाव निंबाळकर येथील पानसरेवस्तीनजिक बिबट्याने पुन्हा दर्शन देत एक बोकड व शेळी फस्त केली. काही दिवसांपासून बिबट्या येथे मानवी वस्तीत फिरत असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी वन विभागाला दिली होती. खोमणे वस्तीत बिबट्याने हल्ला केल्या नंतर दुसऱ्यांदा बिबट्याने मानवी वस्तीत हल्ला केल्याने नागरिक धास्तावले आहेत.
खोमणे वस्तीत बिबट्याने यापूर्वी दोन शेळ्यांचा फडशा पाडला होता. तेव्हापासून दिवसा देखील शेतीत जाण्यास शेतकरी कचरत आहेत. बिबट्या या परिसरात असल्याने व उसाच्या तोडणीचा कालावधी सुरू असल्याने बिबट्या आडोशाच्या भागातून मानवी वस्तीकडे येण्याचीच भिती जास्त असल्याने सध्या शेतकरी धास्तावले आहेत. रात्रीच्या वेळी तर शेतकऱ्यांनी काम बंद ठेवले आहे.
दरम्यान वन विभागाच्या वतीने या परिसराची पाहणी करून ठशांची पाहणी केल्यानंतर ते बिबट्याचेच असल्याचे निदर्शनास आल्याने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे वनविभागाच्या सूत्रांनी आवाहन केले आहे.