दौंड तालुक्यातील कानगाव येथील घटना, १२ तासानंतरही बेपत्ताच
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कानगाव येथील भीमा नदीपात्रात मांडवगण फराटा येथील विवाहीत जोडपे शुक्रवारी ( ता. १० ) मासे पकडायला गेले, मात्र मासे पकडताना पती पाण्यात पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. गेल्या बारा तासापासून पथके त्याचा तपास घेत आहेत, अजूनही त्याचा तपास लागलेला नाही.
भारत पितांबर भालेराव ( वय 35 रा, मांडवगण फराटा ता. शिरूर,जि,पुणे ) असे या वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. भारत आणि त्याची पत्नी दोघेही शुक्रवारी दुपारी मासेमारी करण्यासाठी नदीच्या पात्रामध्ये गेले होते. मासेमारी करत असताना भारत हा पाण्याच्या डोहात पडला, तो बुडू लागल्याने त्याच्या पत्नीने आरडाओरडा सुरू केला. मात्र तो पर्यंत तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला होता. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या आसपास घडली. त्यानंतर तेव्हापासून ग्रामस्थ आणि पाटस पोलिस या युवकाचा शोध घेत आहेत.
कानगाव, गार, सोनवडी या गावात नदीपात्रात ही शोध मोहीम सुरू आहे. पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, पोलीस हवालदार बाळासाहेब पानसरे, संतोष मदने, यांच्यासह पोलीस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ या शोध मोहिमेत सहभागी आहेत.










