
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापुर मध्ये शहरातील महतीनगर येथील 72 वर्षीय कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर आज भिगवण स्टेशन येथील 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, लासुर्णे येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेला ही कोरोनाची लागण झाली आहे. इंदापूर मधील आजचा पाचवा कोरोनाचा बळी आहे.
गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, आता पुन्हा लासुर्णे, भिगवण स्टेशन या ठिकाणी कोरोनाचे बाधित रुग्ण सापडले. यामुळे तालुक्याला कोरोनाचा विळखा हळूहळू जोर लावू लागल्याचे चित्र दिसत आहे. काल रात्री इंदापूर येथील महतीनगर येथील 72 वर्षीय व्यावसायिकाचा पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये कोरोना वरील उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आज स्टेशन येथील कोरोना ग्रस्त महिलेच्या मृत्यूमुळे इंदापुर हादरले.
दरम्यान लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला. या परिचारिकेच्या संपर्कात नेमके कोणते रूग्ण आले होते व किती आले होते, याची चाचपणी आरोग्य खात्याकडून सुरू असून दवाखान्यापर्यंत कोरोना पोचल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.










