अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
मुंबईतील २ रुग्णांसह आज महाराष्ट्रातील ओमीक्रॉन कोराना रुग्णांची संख्या १० वर जाऊन पोचली आहे. यापैकी ७ पुण्यात, २ मुंबईत तर १ डोंबिवलीतील आहे.
देशात हीच संख्या ६ डिसेंबरअखेर २३ वर गेली. काल मुंबईतील दोन रुग्णांना ओमीक्रॉन कोरोना संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांनाही कुठलीही लक्षणे जाणवलेली नाहीत. मुंबई महापालिकेने विमानतळावर कोवीड तपासणी सुविधा सुरु केली आहे.
त्यातून १६ जणांचा कोवीड संसर्ग उघडकीस आला. त्यातील दोन जणांना ओमीक्रॉन प्रकारातील कोवीड झाल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे.
पुण्यात नायजेरियातून परतलेल्या कुटुंबाला ओमीक्रॉन कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. अनिवासी महिला आणि तिच्या दोन मुलींना हा संसर्ग झाला आहे. यापूर्वी पुण्यात सापडलेल्या ४ ओमीक्रॉन रुग्णांसह पुण्यात एकूण ७ ओमीक्रॉन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.