दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावात काल दिवसभरात १३ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. काल ९३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यातील दौंड शहरातील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. दरम्यान, एकाच दिवशी १३ रुग्ण आढळल्याने दौंडकरांची धाकधूक दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
काल तालुक्यातील ग्रामीण भागात सोनवडी, पारगाव, भरतगाव,हंडाळवाडी येथे कोरोनाने शिरकाव केला असून पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. काल दिवसभरात दौंड शहरात आठ व ग्रामीण भागातील विविध गावात पाच अशा तेराजणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला आहे.
दरम्यान, दौंड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात नव्याने कोरोनाग्रस्तांची भर पडत आहे. कोरोना रुग्ण संख्येत होत असलेली लक्षणीय वाढ पाहता दौंडला कोरोनाचा विळखा बसला आहे. त्यामुळे दौंडकरांची धाकधूक वाढली असून प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी आता होवू लागली आहे.










