महान्यूज लाईव्ह
पुणे शहराचा भाग असलेल्या हडपसर, फुरसुंगी परिसरात गेले काही दिवस बिबट्या दिसत असल्याची चर्चा होती. आज (मंगळवार ) सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला आहे. हडपसरमध्ये गोसावी वस्ती, सिरम कंपनीमागे आज पहाटे साडेपाच वाजता हा हल्ला झाला.
गोसावी वस्तीवरील संभाजी आटोळे आणि अमोले लोंढे हे आज सकाळी मार्गिंग वॉकसाठी जात होते. त्यावेळी बिबट्याने संभाजी आटोळे यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यामध्ये संभाजी आटोळे हे जखमी झाले. या प्रकाराची माहिती मिळताच तिथे मोठी गर्दी जमा झाली. बिबट्या जवळच्याच पडक्या घरात, झुडुपात लपला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार चेतन तुपे यांनी वनविभागाला कळविले आहे. अग्निशमन दलाचे जवान तसेच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोचले आहेत.
या घटनेमुळे पुणे शहराच्या परिसरातही बिबट्याचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे हडपसर परिसरात दहशत निर्माण झाली आहे.