इंदापूरच्या कोरोना उपचाराचा व्हावा महाराष्ट्र पॅटर्न
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
डेंग्यूच्या रुग्णाप्रमाणे कोरोनाग्रस्तांना इंदापूरातून फिरवल्याची जशी टिका आरोग्य खात्यावर झाली, तसेच कौतुकही आरोग्य खात्याचे इंदापूरात होत असून डेंग्यूच्या रुग्णाप्रमाणेच कोरोनासारख्या संसर्गजन्य व भयानक आजाराचे रुग्ण सहजगत्या उपचाराने बरे केले..इंदापूरातील कोविड केअर सेंटरचा धडा संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना आदर्शवत असाच आहे.
इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथील मूळच्या परंतू मुंबईहून आलेल्या मायलेकींना कोरोनाने ग्रासले होते. १६ मे पासून त्यांच्यावर इंदापूर येथील डॉ. कदम गुरूकुल या नव्याने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. या बारा दिवसाच्या उपचारानंतर या मायलेकींना आज प्रशासनाने स्वागत करून घरी पोचवले. यावेळी स्वागत करण्यासाठी खुद्द वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे इंदापूरात आले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे आदींसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक यावेळी उपस्थित होते.
या कोरोनामुक्तीचे वैशिष्ठ्य म्हणजे तालुक्यातील आरोग्य खात्याच्या पथकाने या रुग्णांची विशेष काळजी घेत त्यांच्यावर उपचार सुरू ठेवले. एक्स रे साठी दोन किलोमीटर अंतरावर मायलेकींना फिरवल्याने आरोग्य खाते टिकेचे लक्ष्य बनले होते. कोणतीही काळजी न घेता अगदी सहजपणे डेंग्यूच्या रुग्णाप्रमाणेच कोरोनाच्या रुग्णांशी उपचार केला जात असल्याची टिका यातून झाली. त्यातच एका अधिकाऱ्यांवर कारवाईदेखील झाली होती. अशा स्थितीत इंदापूरमध्ये कोरोनाचे उपचार नकोत असे म्हणण्यापर्यंत लोकांची भावना झाली होती. मात्र याच इंदापूर तालुक्यातील कोरोनावरील उपचाराचे मॉडेल महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी आदर्श ठरेल अशी कामगिरी आरोग्य खात्याने केली.
कोरोनाचे रुग्ण हाताळण्यास किंवा त्यांना प्रत्यक्ष उपचार देण्यापूर्वीच लक्षणे असतील, तर थेट वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला जातो. मात्र इंदापूरच्या उपचाराची प्रक्रिया लक्षात घेता लक्षणे नसलेल्या कोरोनाग्रस्तांवरील उपचार हे स्थानिक पातळीवरही होऊ शकतात व लोकांची कोरोनाप्रती इम्युनिटी हर्ड झालेली आहे हेच दाखविणारी आहे. त्याचा राज्य शासनाच्या आरोग्य यंत्रणेने विचार करून ग्रामीण भागातील हायरिस्क रुग्ण वगळता इतर रुग्णांचे उपचार तालुका पातळीवरच व भविष्यात रुग्ण वाढल्यास स्थानिक ठिकाणीच सरकारी दवाखान्यांमध्येही करण्याचे धाडस करण्यास हरकत नाही असाच धडा या कोरोना उपचाराने दिला आहे.
डॉ. सुरेखा पोळ, तालुका आरोग्य अधिकारी, इंदापूर – या रुग्णांसाठी आरोग्य खात्याने खूप मनापासून काम केले. तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांच्यापासून तालुक्यातील आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांनी एकदिलाने केलेल्या कामाची ही पावती आहे. लोकांची समूह प्रतिकार शक्ती वाढल्याचेही यातून दिसते आहे. त्यामुळे कोरोनाची भीती घेण्याची गरज नाही, काळजी करून दक्षता घ्यावी हे महत्वाचे आहे.












इंदापुर तालुक्यामध्ये आर.बी.एस.के नावाचा काम स्टाफ करतो हे कोणालाच माहीत नाही का ? तालुका रुग्णालय इंदापुर मध्ये आर.बी.एस.के प्रोग्राम मधील सर्व डाँक्टर…नर्सेस व औषध निर्माते यांना ड्युटी लावल्या होत्या…या ड्युटी करुन कोरोना संशयीत रुग्ण शोधने…तपासने…त्यांना वेळो वेळी फाँलो करणे ..तसेच कदम गुरुकुल येथे ठेवलेल्या कोरोणा रुग्णाची ड्युटी रात्र व दिवस केलेली आहे..पण याचा कोणीच उल्लेख करत नाही…त्यांचे ड्युटी लावणारे…इंचार्ज यांना सुद्धा साधा उल्लेख करावासा वाटला नाही….स्थानिक नावे आवर्जुन पुढे केलेले दिसतात…
OK…WE DESERVE IT