राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी केले कौतुक
इंदापूर : महान्युज लाईव्ह
लॉकडाऊन च्या कालावधीत इंदापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उत्तम गुणवत्ता वाढावी यासाठी ऑनलाइन प्रणाली वापर केला यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयोग होणार असल्याचे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व शिक्षकांना ऑनलाईन बक्षिसाचे वितरण सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, सतिश भोंग, मैनुद्दीन मोमीन, दिनेश काळे आदी यावेळी उपस्थित होते.
गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी या उपक्रमाची माहिती दिली. 8 एप्रिल ते 20 एप्रिल या कालवधीमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गाच्या एकूण चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये तालुक्यातील व तालुक्याबाहेरील 66 हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी गूगल फॉर्म तयार करण्यात आला.तो संपूर्ण तालूक्यातील विद्यार्थ्यापर्यंत पोहचविला. या स्पर्धेत एकूण 937 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यांचे क्रमांक काढून विजेत्यांना प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात आली.
तालुक्यातील शिक्षकांची शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दिनांक 7 मे ते 17 मे या कालावधीमध्ये घेण्यात आली. तालुक्यातील शिक्षकांनी यात उत्स्फुर्त सहभाग घेतला. सर्व स्पर्धकांचे व्हिडिओ इंदापूर लर्न फ्राँम होम या यू ट्यूब चँनेलवर प्रसारीत करण्यात आले. या सर्व विजेत्यांसाठी लोणी देवकर येथील सुदर्शन जीन्स या कंपनीने प्रथम क्रमांकासाठी एक हजार रूपये, द्वितीय क्रमांकासाठी 700 रूपये व तृतीय क्रमांकासाठी 500 रूपये अशी एकूण 14 हजार रूपयांची पारितोषिके प्रायोजित केल्याने विद्यार्थी व शिक्षकांनाही प्रोत्साहन मिळाले.










