पहिल्याच दिवशी टोमॅटो, फ्लॉवरच्या दरात घसरण
बारामती : महान्यूज लाईव्ह
तब्बल ५७ दिवसानंतर आज बारामतीच्या बाजार समितीचा जळोची येथील भाजीबाजार खुला झाला. आज पहिल्याच दिवशी ३०० क्विंटल फळे, भाज्या व शेतमाल खरेदी विक्रीसाठी उपलब्ध झाला. मात्र आजच्या बाजारात कोबी, दुधी भोपळा, टोमॅटो, फ्लॉवर, वांग्याला निचांकी भाव मिळाला.
जळोची येथील भाजी बाजार गेल्या जवळपास दोन महिन्यापर्यंत बंद होता. कोरोनाच्या भीतीने व भाजीपाल्याबाबत पसरवलेल्या अफवांमुळेही सुरवातीस भाजीबाजार बंद ठेवल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यातच बारामतीतही कोरोनाचे रुग्ण आढळल्याने यावर विपरित परिणाम झाला होता. त्यामुळे २३ मार्च २०२० पासून भाजीबाजारातील लिलाव बंद झाले. विशेष म्हणजे पणन खात्याने भाजीबाजार सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते, मात्र स्थानिक ठिकाणची स्थिती व एकूणच राज्यभरात बाजार चालू-बंद होत असल्याने त्याचाही परिणाम या लिलावावर होण्याची शक्यता गृहीत धरून विक्रेते, व्यापारी व शेतकऱ्यांनी बाजार बंद ठेवला.
आज ५७ दिवसानंतर भाजीबाजार सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी आवक तशी तुलनेने कमी असली तरी शेतकरी, विक्रेत्यांचा प्रतिसाद मात्र उत्साही राहीला. कोथिंबीरीच्या जुडीची तब्बल ६ हजार आवक झाली. बटाटा १७०क्विंटल, कांदा ९३ क्विंटल, फळे व इतर भाज्या १०१ क्विंटल आवक झाली.
अरविंद जगताप, सचिव बारामती बाजार समिती – ५७ दिवसानंतर आज पहिल्यांदाच भाजीपाल्याचे लिलाव झाले, याचे शेतकऱ्यांबरोबर सर्वांनाच समाधान आहे. बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालकांनी प्रयत्नपूर्वक हा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला व आज पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांत भावातील दरात स्थिरता येईल.
आज भाजीबाजारात शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळालेला भाव पुढीलप्रमाणे
कोथिंबीर प्रतिपेंडी ७ ते १५ रुपये
मेथी प्रतिपेंडी ७ ते १५ रुपये
पालक प्रतिपेंडी ५ ते १० रुपये
शापू प्रतिपेंडी ८ ते १० रुपये
हिरवी मिरची प्रतिकिलो १५ ते ३५ रुपये
सिमला मिरची प्रतिकिलो १२ ते २५ रुपये
वांगे प्रतिकिलो ५ ते १५ रुपये
काकडी प्रतिकिलो ५ ते १५ रुपये
शेवगा शेंग प्रतिकिलो ७ ते १५ रुपये
भेंडी प्रतिकिलो १२ ते २० रुपये
कारले प्रतिकिलो १० ते २५ रुपये
फ्लॉवर प्रतिकिलो २ ते ५ रुपये
दोडका प्रतिकिलो १५ ते २५ रुपये
टोमॅटो प्रतिकिलो २ ते ६ रुपये
आले प्रतिकिलो २० ते ४० रुपये
लसूण प्रतिकिलो ३० ते ७० रुपये
गवार प्रतिकिलो १५ ते ३० रुपये
दुधी भोपळा प्रतिकिलो २ ते ६ रुपये
कोबी प्रतिकिलो २ ते ५ रुपये
घेवडा प्रतिकिलो २० ते ३५ रुपये
लिंबू प्रतिकिलो १५ ते ३० रुपये
बटाटा प्रतिकिलो १८ ते २२ रुपये
कांदा प्रतिकिलो २ ते ७ रुपये











