बारामती : महान्यूज लाईव्ह
उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याच्या विषयावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या दोन आंदोलकांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी हे 10 हजार अश्वशक्तीच्या पंपाद्वारे इंदापूर तालुक्यातील खडकवासला उजव्या कालव्यात आणि सणसर जोड कालव्याद्वारे निरा डाव्या कालव्यात सोडण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे. या संदर्भातील सर्वेक्षणाच्या योजनेला राज्य सरकारने 22 एप्रिल रोजी मंजुरी दिली आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात हा पाणीप्रश्न चांगलाच पेटला.
यावरून सुरुवातीच्या काळात पालकमंत्री दत्तात्रय भरणे व नंतरच्या काळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे पुतळे विरोधकांनी व आंदोलकांनी जाळले व निषेध केला. या नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील विविध ठिकाणी रास्ता रोको करून इंदापुरातील पाणीप्रश्नावर राजकारणाची फोडणी दिली.
उजनी धरणालगत यासंदर्भात बेमुदत धरणे आंदोलनास बसलेल्या आंदोलकांनी आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर बारामतीची पोलिस यंत्रणा सज्ज झाली. आज सकाळी काही आंदोलक बारामतीकडे निघाल्याचे समजताच पोलिसांनी सुरक्षा वाढवली व या दरम्यान आलेल्या दोन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.