इंदापूर : महान्यूज लाईव्ह
मुंबईतील कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या कुटुंबामुळे आज इंदापूर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा तीन वर पोहोचला. दोन दिवसापासून या गोष्टीची चर्चा होती व भीती होती, ती भीती खरी ठरल्याने इंदापूर तालुक्यात बाहेरून येणाऱ्या विषयी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भिगवण नंतर कोरोना बाधित आढळला नसल्याने इंदापूर तालुक्यात दिलासा मिळाला होता, मात्र मुंबईतून शिरसोडी या मूळ गावी आलेल्या एका कुटुंबातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आज इंदापूर तालुक्यातही कोरोना विषयी काळजी निर्माण झाली आहे. आरोग्य सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही रुग्ण एकाच कुटुंबातील असून चार जणांचे घशातील द्रवाचे नमुने पाठवले होते, त्यापैकी 35 वर्ष वयाच्या महिला व तिच्या अकरा वर्षीय मुली कोरोना ची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
हे कुटुंब कोरोनाबाधित मुंबई क्षेत्रातून आले होते. शिरसोडी हे त्यांचे मूळ गाव असून त्या कुटुंबाच्या चारही सदस्यांना आरोग्य खात्याने इंदापूर येथील शासकीय वसतिगृहात क्वारंटाईन केले होते. त्या चौघांचे घशातील द्रवाचे नमुने आरोग्य खात्याने पुण्यात तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा रात्री उशिरा अहवाल आला. यामध्ये दोघांचे अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत. या मुळे इंदापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. इंदापूर आता एकूण बायकांचे संख्या तीन वर पोचली असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.











