राजेंद्र झेंडे, दौंड : महान्यूज रिपोर्ट
येथील राज्य राखीव दलातील आणखी १५ जवानांचा कोरोना विषाणूचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संग्राम डांगे यांनी दिली. दौंड तालुक्यात आता एकूण 25 कोरोनाग्रस्त आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीदरम्यान राज्यातील मुंबई येथे बंदोबस्तावर असलेल्या राज्य राखीव बल गट क्र ७ च्या ९५ जवानांची एक तुकडी काल दौंड येथे दाखल झाली होती. या सर्व जवानांची कोरोना विषाणूची तपासणी केली असता यातील १५ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ६ जवानांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी असून ७४ जवानांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दौंड तालुक्यात दहिटणे येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. तर ९ जवानांना कोरोनाचा संसर्ग झाला होता,आता पुन्हा १५ जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने दौंड करांची चिंता वाढली आहे, राज्य राखीव दलातील २४ जवानांना कोरोनाची लागण झाल्याने दौंड पुन्हा हादरले आहे. तालुक्यात आता कोरोनाचे एकुण २५ रूग्ण आहेत. शून्यावरून थेट २५ वर दौंडमधील कोरोनाग्रस्त पोचले असले तरी मुंबईत बंदोबस्त यशस्वी केलेल्या जवानांविषयी दौंडकरांना अभिमानच आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या सर्व जवानांना पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार असून तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन डॉ. डांगे यांनी केले आहे.










