बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्य सरकारने शुक्रवार रात्री ते सोमवार सकाळपर्यंत संपूर्णतः लॉकडाऊन जाहीर केला असला तरी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय देखील यामध्ये समाविष्ट केला आहे. यामध्ये ही इतर दुकाने कधीपासून बंद, कधी पासून चालू, याचा कोणताही उल्लेख केलेला नाही, परंतु संपूर्ण आदेशाच्या खालील बाजूस पाच एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल असे स्पष्ट केले आहे. शासनाचा हा आदेश गुंतागुंतीचा व शब्द चलाखीचा असल्याने आज दिवसभर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण राहिला. नक्की काय बंद आहे आणि नक्की कधीपासून बंद आहे, याची माहिती देण्यास प्रशासनाकडून कोणी उपलब्ध झाले नसल्यामुळे संभ्रम अधिक वाढला आहे.
पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी संध्याकाळी इंजेक्शन संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या, तर दुसरीकडे पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी नव्याने आदेश काढत सर्व दुकाने बंद करण्यासंदर्भात सूचना दिल्या, परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नेमकी काय परिस्थिती राहील, याविषयी व्यापाऱ्यांमध्ये तसेच एकूणच सर्व व्यावसायिकांमध्ये देखील संभ्रम कायम राहिला.
लॉकडाऊन फक्त शुक्रवार ते सोमवारी सकाळपर्यंत आहे की खरोखरच सर्व दुकाने 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत याविषयी स्पष्टता नसल्यामुळे, मागच्या दाराने लॉकडाऊन हीच संकल्पना शासन राबवणार असल्याचे व्यापारी बोलू लागले. दरम्यान यासंदर्भात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, अनेक अधिकाऱ्यांनी आम्ही आत्तापर्यंत सुधारित आदेश पाहिलेला नाही, एवढीच माहिती दिली. मात्र मोघम माहिती असल्याने त्यांनीही या संपूर्ण परिस्थितीबाबत संभ्रम तसाच कायम ठेवला.
दरम्यान रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी सूचना केल्या होत्या की, लॉकडाऊन हा शब्द वगळा, परंतु लॉकडाऊन सारखेच कठोर निर्बंध ठेवा.. तर तोच संदर्भ घेऊन राज्य शासनाने फक्त लॉकडाऊन हा शब्द वगळून सर्व परिस्थिती लॉकडाऊन सारखीच ठेवण्याची चलाखी साधलेली आहे की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान पुण्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील सर्व दुकाने बंद राहणार आहेत की काय याविषयी अद्याप स्पष्टता मिळाली नाही. आता उद्याच प्रशासनाकडून या संदर्भातील माहिती मिळेल. अशी चर्चा व्यापाऱ्यांमध्ये होती.
दरम्यान बारामती तसेच पुण्यातील ग्रामीण भागाशी संबंधित वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधला असता, काही अधिकाऱ्यांनी आपल्यालाही पूर्ण माहिती नसल्याचे सांगितले. म्हणजेच शासन पूर्णतः लॉकडाऊन करणार आहे, परंतु त्याची स्पष्ट माहिती देणार नाही असेच यातून सूचित होत आहे. पुण्यात पुणे व्यापारी महासंघाने दुकानांसाठी वेळ वाढवून द्यावी अशी विनंती केली होती मात्र प्रशासनाने सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्या कारणाने पुण्यातील दुकाने उद्यापासून बंद राहणार आहेत.
त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील देखील दुकाने बंद ठेवली जाणार आहेत की कसे या संदर्भातील माहिती प्रशासनाने जाहीर करण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भातील आपत्ती व्यवस्थापनाचे आदेश सरकारने जारी केलेले आहेत, त्यामध्ये स्पष्टता नाही. सर्व नियम लिहिल्यानंतर एका ठिकाणी हे सर्व आदेश 30 एप्रिलपर्यंत आहेत असे नमूद केले आहे, तर सुरुवातीच्या भागात त्यांनी फक्त शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत पूर्णतः लॉकडाउन असा शब्दप्रयोग वापरला आहे. त्यामुळे हा संभ्रम वाढला आहे.











