बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती ओद्योगिक वसाहतीतील काही उद्योग ३० टक्के कामगारांच्या माध्यमातून सोमवार (ता.४) पासून सुरू होणार आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत आले होते. यावेळी उद्योगांच्या प्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात प्रशासनाने तयारी सुरू केल्याची माहिती त्यांनी घेतली.बारामती कोरोनामुक्त झाल्यानंतर उद्योगाच्या प्रतिनिधींनी २८ एप्रिल रोजी प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. त्यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेऊन यासंदर्भात काही नियमावली व अटी मांडल्या होत्या. यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातून म्हणजे बारामती शहरातून कामगारांना ये-जा करण्याची परवानगी मिळणार नाही, ४५ वर्षे वयाच्या पुढील कामगारांना सद्यस्थितीत कामावर शक्यतो बोलावू नये, दुचाकींना परवानगी मिळणार नाही तसेच किमान ३० टक्के कामगारांवर कामे सुरू करावीत अशी सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. यापूर्वी बसमधूनच कामगारांची ये-जा करावी व कंपनीने कामगारांची आतमध्येच राहण्याची व्यवस्था करावी अशी सूचना प्रशासनाने केली होती, प्रत्यक्षात ते शक्य नसल्याचे प्रतिनिधींनी सांगितल्यानंतर यामध्ये शिथीलता आणत कामगारांना पासेस देताना चारचाकींना परवाने देऊ, मात्र त्यांची संख्या व कामगारांची संख्या निश्चित करावी तसेच ज्या कंपन्या काम सुरू करण्यास तयार आहेत, त्यांची संख्या निश्चित करावी अशी सूचना एमआयडीसीला देण्यात आल्या होत्या. दरम्यान आज अजित पवार यांनी बारामतीत कोरोना रुग्णालय केलेल्या रुई ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली व तेथील सुविधांची माहिती घेतली. तेथे करावयाच्या उपाययोजनांची स्थानिक यंत्रणेकडून माहिती घेतली.










