बारामतीत कोरोनाशी संबंधित वैद्यकीय सुविधा तातडीने सुरू करण्याच्या सूचना
बारामती : महान्यूज लाईव्ह
येत्या काही दिवसांत कोरोना संशयित रुग्णांची बारामतीतच तपासणी होणार आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने तपासणी सुरू करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी रुग्ण पुण्याला पाठवण्याची गरज भासणार नाही. पर्यायाने पुण्यातील रुग्णालयांवरील तपासणीचा ताणही कमी होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ना. पवार यांनी बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच येथील रुई ग्रामीण रुग्णालयात 50 खाटांचे कोरोना केअर सेंटरही सुरू करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी योगेश कडूसकर, पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, सिल्व्हर ज्युबिली शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद काळे, नगरसेवक किरण गुजर, रुई ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल दराडे उपस्थित होते.
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या “बारामती पॅटर्न”ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची सूचना अजित पवार यांनी केली. बारामतीकरांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. बारामती शहरातील हॉटस्पॉट वगळून इतर भागात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबतचे व्यवहार सोशल डिस्टंनसिंग राखून सुरु करणे शक्य आहे का? या बाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्ष, बेड तसेच व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्यक सुविधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे. रेशनच्या धान्याच्या वाटपाचे योग्य प्रकारे नियोजन करावे, शासकीय योजनांचा लाभ सर्वच लाभार्थ्यांना मिळेल, यादृष्टीने काळजी घेण्यात यावी, अशा सूचना केल्या.
त्याचप्रमाणे बारामतीमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यात येत असल्याने कोणीही घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे अनिवार्य असल्याचे सांगून याबाबत सर्वच नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शिवभोजन थाळीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्याच्या सूचना केल्या. परराज्यातील कामगारांच्या निवास आणि भोजनाचा आणि स्वस्त धान्य पुरवठ्याचा आढावा घेऊन सूचना केल्या. त्याचबरोबर सर्वच खाजगी डॉक्टरांनी दवाखाने उघडे ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी जनाई उपसा जलसिंचन तसेच शेतीविषयक अडचणींविषयी या बैठकीत त्यांनी सूचना केल्या.










