दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहारातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रेल्वे स्टेशनमधील एका हाॅटेलला गुरुवारी (ता.२६) सायंकाळी साडेपाच च्या सुमारास अचानक मोठी आग लागली. या आगीत हॉटेलमधील साहित्य जळून खाक झाले आहे, मात्र सुदैवाने आगीवर वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
दौंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरील फुडीज प्लाझा या हॉटेलच्या स्वयंपाकगृहाला आग लागली आणि काही क्षणात आगीचा भडका उडाला. आगीची झळ पत्र्याला बसली आणि पत्र्यावर ठेवलेल्या पुठ्ठ्याच्या रिकाम्या खोक्यांना आग लागल्याने आग पसरली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
आग विझण्यासाठी हॉटेल मालकाकडे आग विझविण्यासाठीचे पुरेसे साहित्य नसल्याने ही आग आटोक्यात येत नव्हती, दरम्यान, ही लागली तेव्हा पुणे-गोरखपूर ही एक्सप्रेस प्लांट क्रमांक दोन वर उभी होती.
आग वाढू लागल्याने एक्सप्रेस मधील प्रवासी आणि फलाटावरील लोकांमध्ये गोंधळ उडाला होता. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक तेजप्रकाश पाल यांच्यासह रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. रेल्वे स्थानकावर विविध ठिकाणी असलेले अग्निशामक साहित्यांचा वापर करून आणि पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत हॉटेलचे मोठे नुकसान झाले. या घटनेने रेल्वे स्टेशन परिसरात बराच वेळ भीती आणि गोंधळाचे वातावरण होते.










