भिगवण : महान्यूज लाईव्ह
भिगवण परिसरात उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चक्क ऊसतोड मजुरावर हल्ला केल्याची थरारक घटना घडली. मात्र, संबंधित मजुराने समयसूचकता आणि धाडस दाखवत हातातील कोयत्याने बिबट्यावर प्रतिहल्ला केल्याने त्याचा जीव वाचला असून, बिबट्यानेही तिथून धूम ठोकली. या घटनेमुळे भिगवण आणि परिसरातील शेतकऱ्यांसह ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शंकर कैलास मोरे (रा. शनी देवगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास भिगवणजवळील जाधव वस्ती येथील आशिष गुणवरे यांच्या उसाच्या शेतात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष गुणवरे यांच्या शेतात सध्या ऊस तोडणीचे काम सुरू आहे. सायंकाळच्या सुमारास शंकर मोरे हे ऊस तोडण्यात मग्न असताना उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात मोरे यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात येताच न घाबरता मोरे यांनी जीवाच्या आकांताने आणि प्रसंगावधानाने आपल्या हातातील कोयत्याने बिबट्याला मारण्याचा प्रयत्न केला. कोयत्याचा प्रहार चुकवत बिबट्याने तिथून पळ काढला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
वनविभागाला माहिती; होणार रेस्क्यू ऑपरेशन
या घटनेबाबत माहिती देताना बाजार समितीचे माजी सभापती तथा कर्मयोगी कारखान्याचे विद्यमान संचालक पराग जाधव यांनी सांगितले की, “या भागात शक्यतो बिबट्याचे वास्तव्य नव्हते. गेल्या काही वर्षांपूर्वी भिगवण आणि डिकसळ परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते, त्यानंतर तो कधी दिसला नव्हता. परंतु आजच्या घटनेमुळे ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांनी अधिक सजग व सावध राहणे गरजेचे बनले आहे. या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली असून, उद्या (सोमवारी) वनविभागाकडून या परिसरात बिबट्याचा शोध घेऊन रेस्क्यू मोहीम राबवली जाणार आहे.”










