राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस व वरवंड येथील २४ व २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरातील सराईत गुन्हेगार, गावगुंड, गुन्हेगारी टोळ्या तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तातडीने स्थानबद्ध करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे महानगराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन काही स्थानिक सराईत गुन्हेगारांकडून चोरी, मारामारी, दहशत निर्माण करणे तसेच गंभीर गुन्हे घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील यात्रेदरम्यान काही हत्यारबंद गुन्हेगारांचा मोठा कट उघडकीस आला होता आणि पोलिसांनी पाठलाग करून त्यांच्याकडून तीन ते चार पिस्तुले हस्तगत केली होती. ही गंभीर घटना लक्षात घेता आगामी यात्रेपूर्वीच पोलिसांनी प्रतिबंधात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. यात्रा हा श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे सामान्य नागरिक, महिला, लहान मुले आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होता कामा नये; केवळ घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य गुन्हे रोखण्यासाठी आधीच प्रभावी पोलीस यंत्रणा कार्यान्वित करावी, असे मत मोहिते यांनी व्यक्त केले.
या निवेदनाद्वारे परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींची सखोल तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर तरतुदींनुसार स्थानबद्धता व हद्दपारीची कारवाई करावी, तसेच अवैध शस्त्रांची तपासणी करून शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती यवत व दौंड पोलीस ठाण्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेड बघ्याची भूमिका घेणार नसून, पोलीस प्रशासनाने वेळेत ठोस कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मोहिते यांनी दिला आहे.










