पुणे : आगामी काळात वातावरणातील बदलांमुळे डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू आणि मलेरियासारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबर २०२६ ते सप्टेंबर २०२७ या कालावधीत निर्माण होणाऱ्या संभाव्य आरोग्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक स्तरावर ‘ग्रेड-३’ हा सर्वाधिक गंभीर मानला जाणारा अलर्ट लागू केला असून, भारतासह दक्षिण आशियाई देशांना ‘अल-नीनो’चा मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, अल-नीनोच्या प्रभावामुळे ऋतुचक्रात मोठे बदल घडण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम डासांच्या वाढीवर होणार आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया आणि इतर कीटकजन्य आजारांचा प्रसार वेगाने वाढू शकतो. यासोबतच यंदा भारतात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणे आणि पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या विचित्र हवामानामुळे उन्हाचा तडाखा वाढून नागरिकांना डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि उष्माघाताचा त्रास होऊ शकतो; तर पाणीटंचाईमुळे दूषित पाण्याचा वापर वाढून पोटाचे विकार आणि इतर संसर्गजन्य आजार बळावण्याचा धोका आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आधीपासूनच आजारी असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्यासोबतच अल-नीनोचा फटका शेती आणि पाणीपुरवठ्यालाही बसण्याची चिन्हे आहेत. मान्सूनवर परिणाम होऊन पाऊस कमी झाल्यास शेती पिकांचे नुकसान होऊन अन्नधान्य उत्पादन घटण्याची आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फटका शेतकरी आणि शेतमजुरांच्या उत्पन्नावर बसू शकतो.
या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सर्व आरोग्य यंत्रणांना आगाऊ सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा, स्वच्छ पाणीपुरवठा आणि व्यापक जनजागृतीवर भर देण्यास सांगण्यात आले आहे. अल-नीनोमुळे सर्वत्रच दुष्काळ किंवा आरोग्य आणीबाणी येईल असे नसून स्थानिक हवामान परिस्थितीवर हे अवलंबून असले, तरी संभाव्य साथरोगांचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी आणि प्रशासनाने वेळीच खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.










