पुणे, दि. १२ : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वेतनश्रेणीसाठी आवश्यक असलेले ‘वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण’ उद्या, शुक्रवार दि. १३ ते २२ नोव्हेंबर २०२६ दरम्यान सलग दहा दिवस आयोजित करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात यंदा सुमारे ३,१३७ प्रशिक्षणार्थी शिक्षक असून, त्यांच्या सोयीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (DIET) वतीने जिल्ह्यात १५ प्रशिक्षण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. दि. २२ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षणार्थींचे मूल्यमापन केले जाणार असल्याची माहिती ‘डायट’चे प्राचार्य तथा उपसंचालक नामदेव शेंडकर यांनी दिली.
पुणे ग्रामीण, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच खडकी, देहू रोड व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील शिक्षकांसाठी ही केंद्रे सज्ज झाली असून, सर्व ठिकाणी शिक्षक हस्तपुस्तिका पोहोचवण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदणी केलेल्या गट किंवा शहर साधन केंद्राच्या ठिकाणी सकाळी ९.०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण दररोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत चालेल.
एका तासाची गैरहजेरीही पडणार महागात
हे प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) ऑनलाइन प्रणालीवर आधारित असल्याने प्रत्येक तासाला प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे. “एखादा शिक्षक एका तासालाही अनुपस्थित राहिल्यास ऑनलाइन प्रणालीत पुढील तासिकेस व पुढील दिवशी तो आपोआप अनुपस्थित दिसेल. त्यामुळे संबंधित शिक्षकास पुढील प्रशिक्षण पूर्ण करता येणार नाही आणि त्यांना नव्याने पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागेल,” असा इशारा ‘डायट’चे विभाग प्रमुख राजेंद्र वाकडे यांनी दिला आहे.
कला-क्रीडा व अध्यापक विद्यालय शिक्षकांचे नियोजन
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ज्या शिक्षकांनी नोंदणी करताना तालुका ‘हवेली’ किंवा ‘पुणे शहर’ निवडला आहे, त्यांना त्याच तालुक्यात प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. तसेच राज्यातील सर्व अध्यापक विद्यालयातील शिक्षक आणि पुणे विभाग स्तरीय कला व क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण खडकी एज्युकेशन सोसायटीच्या वैदेही दत्ताजी गायकवाड ज्युनिअर कॉलेज (आलेगावकर हायस्कूल परिसर, खडकी) येथे होणार आहे. पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील कला-क्रीडा शिक्षक पहिले सात दिवस आपापल्या तालुक्यात आणि शेवटचे तीन दिवस (दि. २० ते २२ नोव्हेंबर) खडकी येथील केंद्रावर प्रशिक्षण पूर्ण करतील, असे विभाग प्रमुख विजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांच्या सूचना
संबंधित केंद्रावरील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रशिक्षणासाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिल्या आहेत. तर, सर्व प्राथमिक शिक्षकांनी १० दिवसांचा अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करावी; त्यानंतर गुणांकाच्या आधारे प्रमाणपत्र दिले जाईल, असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले-कावडे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील १५ प्रशिक्षण केंद्रे पुढीलप्रमाणे :
पुणे शहर : १. फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे (निवड वेतनश्रेणी), २. मॉडर्न महाविद्यालय, पुणे (वरिष्ठ वेतन श्रेणी). हवेली : वैदेही दत्ताजी गायकवाड ज्युनिअर कॉलेज, आलेगावकर हायस्कूल परिसर, खडकी, पुणे. पुरंदर : वाघिरे विद्यालय, सासवड. मुळशी व राजगड (एकत्रित) : आर. एम. धारिवाल स्कूल, वारजे-कात्रज देहूरोड रस्ता, पुणे. मावळ : इम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव दाभाडे. खेड : महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर. जुन्नर : रा. प. सबनीस विद्यालय, नारायणगाव. इंदापूर : १. नंदिकेश्वर विद्यालय, जंक्शन (निवड श्रेणी), २. नारायणदास रामदास हायस्कूल, इंदापूर (वरिष्ठ वेतनश्रेणी). दौंड : नागेश्वर विद्यालय, पाटस. बारामती : लडकत स्कूल ऑफ एज्युकेशन, संभाजीनगर, बारामती. आंबेगाव : रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय, मंचर. शिरूर : डेक्कन इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर बायपास, शिरूर. भोर : श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, भोर










