मुंबई : शेतकरी, तरुण आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून महायुती सरकारवर सातत्याने घणाघाती प्रहार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप केले आहेत. सरकारविरोधातील माझी आक्रमक भूमिका मवाळ व्हावी, यासाठी ‘प्रेशर टॅक्टिक्स’ म्हणून सरकारने आता माझ्या व्यवसायाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे, असा थेट दावा रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केला आहे. थेट सरकारी पातळीवरूनच यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफी, कांदा खरेदीतील गोंधळ, MPSC स्पर्धा परीक्षा आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न, तसेच CET सेल आणि नाशिक कुंभमेळ्यातील विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेला कथित भ्रष्टाचार यांसारख्या अनेक संवेदनशील विषयांवर आमदार रोहित पवार यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. सध्या दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे आणि सामान्य जनतेच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करत त्यांनी सरकारचे अपयश उघडे पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे.
अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठकांची रणनीती; कोण पुढाकार घेतंय याची खडान् खडा माहिती..
रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांनुसार, त्यांच्या वाढत्या आक्रमकतेचा धसका घेतल्यामुळेच सत्ताधाऱ्यांकडून सूडबुद्धीचे राजकारण सुरू झाले आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, या खुनशी सरकारने याचा चांगलाच धसका घेतलाय. म्हणूनच सरकारबाबतची माझी आक्रमक भूमिका मवाळ व्हावी यासाठी प्रेशर टॅक्टिक्स म्हणून त्यांनी माझ्या व्यवसायाला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचं कळतंय. याबाबतची रणनिती आखण्यात येत असून पुढील काही दिवसांत अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली जाईल. त्यासाठी कोण पुढाकार घेतंय याचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचतेय. आता सरकारमधील नेते काय निर्णय घेतात आणि त्याला कोण कोण पाठिंबा देतात याकडं आमचं बारकाईने लक्ष आहे.”
विरोधकांना नामोहरम करण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर?
राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांचा आवाज बंद करण्यासाठी तपास यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा किंवा त्यांच्या उद्योग-व्यवसायांवर दबाव आणण्याचे तंत्र सत्ताधाऱ्यांकडून वापरले जात असल्याचा आरोप यापूर्वीही अनेकदा झाला आहे. आता थेट रोहित पवार यांच्या व्यवसायाची कोंडी करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठकांचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर आल्याने, सत्तेचा गैरवापर कोणत्या थराला गेला आहे, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
जनतेच्या लढ्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न फोल ठरेल
जनतेच्या प्रश्नांवरून सरकारचे वाभाडे काढणाऱ्या एका लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे घेरण्याचा प्रयत्न लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारा असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. “कोण पुढाकार घेतंय आणि पडद्यामागून कोण हालचाली करतंय याची सर्व माहिती आमच्याकडे आहे,” असा स्पष्ट इशारा देत रोहित पवार यांनी सरकारच्या या दबावाला भीक न घालण्याचे संकेत दिले आहेत. आता या आरोपांवरून सत्ताधारी गोटातून काय स्पष्टीकरण येते आणि आगामी काळात हा संघर्ष काय वळण घेतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.










