राजेंद्र झेंडे: महान्यूज लाईव्ह
दौंड : शासकीय नियमांची पायमल्ली करत बेकायदा स्टॅम्प पेपरची विक्री करणे आणि चक्क तालुका कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे बनावट शिक्के व खोट्या सह्या करून बनावट प्रतिज्ञापत्रे (Affidavit) तयार करणाऱ्या एका महाभागाचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी दौंड तालुक्यातील काळेवाडी येथील ज्ञानेश्वरी ऑनलाईन सेंटरच्या चालकावर दौंड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर बाळासो काळे (रा. काळेवाडी, ता. दौंड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथे आरोपी सागर काळे याचे ‘ज्ञानेश्वरी ऑनलाईन सेंटर’ नावाचे दुकान आहे. बुधवारी (दि. ४) दुपारी सुमारे २:२० वाजण्याच्या सुमारास, त्याने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी कोणताही अधिकृत परवाना नसताना ग्राहकांना व परिचितांना शासकीय स्टॅम्प पेपरची बेकायदा विक्री केली.
एवढ्यावरच न थांबता, त्याने दौंड तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नावाचे हुबेहूब बनावट गोल शिक्के तयार करून ते स्टॅम्पवर मारले आणि त्यावर दंडाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या. ही बनावट प्रतिज्ञापत्रे अधिकृत असल्याचे भासवून ती ग्राहकांना विकत शासनाची आणि जनतेची मोठी फसवणूक केली. हा गंभीर प्रकार निदर्शनास आल्यानंतर मंडलाधिकारी वर्षाराणी दळवी यांनी तत्काळ दौंड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
त्यांच्या तक्रारीवरून आरोपी सागर काळे याच्याविरुद्ध बेकायदा स्टॅम्प विक्री आणि शासकीय शिक्क्यांचा गैरवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय यंत्रणेची थेट बनावट कागदपत्रे बाजारात खुलेआम विकली जात असल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या केंद्रातून आजवर अशी किती बनावट प्रतिज्ञापत्रे विकली गेली आणि या बनावट कागदपत्रांच्या आधारे कोणाकोणाचे शासकीय कामे मार्गी लावली गेली, याचा सखोल तपास आता दौंड पोलीस करत आहेत.










