टोरेंट प्रकल्पाविरोधात कर्जतमध्ये मनसेची तोफ धडाडली; राज्य सरकार आणि दिल्लीतील कारभाऱ्यांवर जोरदार प्रहार
कर्जत (विशेष प्रतिनिधी) : टोरेंट हायड्रो पॉवर प्रकल्पाच्या नावाखाली कर्जत परिसरातील निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “सकाळी जंगलात भेट दिली तेव्हा तिथे तोडलेल्या झाडांची रचलेली लाकडं पाहून जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखं वाटलं,” अशा शब्दांत तीव्र संताप व्यक्त करत, सह्याद्री संपवणारा हा विनाशकारी विकास कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. सभेच्या पार्श्वभूमीवर कर्जतमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याच्या प्रकाराचाही त्यांनी समाचार घेतला. इंटरनेट बंद केले म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही; मनात काळं असेल तरच राज्यकर्त्यांना अशा क्लृप्त्या सुचतात, असा टोला त्यांनी लगावला.
कर्जत येथे आयोजित विराट जाहीर सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती आणि केंद्राच्या हस्तक्षेपावर कडक शब्दांत टीका केली. राज्यातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केंद्रात बसलेल्या दोघांकडून शून्य किंमत आहे, अशी टीका करतानाच, महाराष्ट्रातील प्रकल्प दिल्लीत बसलेली दोन माणसे ठरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेच्या आणि पदाच्या भीतीपोटी मान खाली घालून महाराष्ट्राचे निर्णय दिल्लीतून लादले जात आहेत, हे मराठी माणसाचे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.
या प्रकल्पामागील धक्कादायक वास्तव मांडताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पट्ट्यात टेंडर प्रक्रियेशिवाय असे २३ प्रकल्प आणले जात आहेत. भविष्यात येणाऱ्या काही विशिष्ट खासगी प्रकल्पांना पाणी आणि वीज पुरवण्यासाठी सह्याद्रीचा हा बळी दिला जात आहे. अशा प्रकल्पांमुळे स्थानिक भूमीपुत्रांना विस्थापित व्हावे लागेल, त्यांचे मतदारसंघ फुटतील आणि तिथे बाहेरचे लोक आणून वसवले जातील, असा इशारा त्यांनी स्थानिकांना दिला. गडचिरोलीत शेतीची सुपीक जमीन खाणींसाठी दिल्याचा दाखला देत, झाडं तुटल्यावर आभाळात घिरट्या घालणाऱ्या पाखरांसारखी अवस्था भविष्यात इथल्या जनतेची होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीकास्त्र सोडताना, बहिणींना दरमहा १५०० रुपये देऊन त्यांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच डिसेंबरमध्ये महावितरणचा आयपीओ आणून वीज वितरण खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा गंभीर दावाही त्यांनी केला.
या लढ्यात जनतेने स्वतः पेटून उठण्याची गरज प्रतिपादन करताना राज ठाकरे म्हणाले की, ज्या सह्याद्रीत छत्रपती शिवाजी महाराज खेळले-बागडले, तो सह्याद्री आज आपण डोळ्यांसमोर नष्ट होताना हताशपणे पाहत आहोत. शिवरायांच्या आज्ञापत्रात एकाही झाडाला इजा न पोहोचवण्याचे स्पष्ट आदेश होते, मग आपण शिवरायांचे विचार कधी अमलात आणणार? सर्बियामध्ये तिथल्या ‘जेनझी’ने एकत्र येत सत्तापालट करून दाखवला, महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातील तरुण पिढीनेही आपल्या हक्कांसाठी आता जागे झाले पाहिजे.
मी विकासाच्या किंवा उद्योगधंद्यांच्या विरोधात नाही; पण महाराष्ट्राचा विकास कसा असावा हे महाराष्ट्रातील माणसांनी ठरवले पाहिजे, असे स्पष्ट करत त्यांनी जनतेला निवडणुकीत जात-धर्माच्या पलीकडे जाऊन या अन्यायाचा जाब विचारण्याचे आवाहन केले. जर जनता शांत बसणार असेल, तर अशा जनतेचे नेतृत्व करण्यात मला रस नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला. कर्तव्य बजावताना पोलिसांनीही भविष्यातील संकटांचे भान ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांच्या मागे उभे राहू नये, असे भावनिक आवाहन करत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.










