तोडलेल्या झाडांचा अधिकृत आकडा व पर्यावरण परवानग्या जाहीर करण्याची मागणी; निसर्गप्रेमी दौंडकर प्रतिष्ठानचे शासनाला निवेदन
राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील अत्यंत संवेदनशील भीमाशंकर जंगल परिसर आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत-सायडोंगर भागात सुरू असलेल्या प्रचंड वृक्षतोडीवरून पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “विकासाच्या नावाखाली सह्याद्रीचा श्वास गुदमरणार असेल, तर हा कसला जनकल्याणाचा विकास?” असा परखड सवाल उपस्थित करत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करून सह्याद्रीची जैवविविधता वाचवावी, अशी आग्रही मागणी ‘वृक्षप्रेमी व निसर्गप्रेमी दौंडकर प्रतिष्ठान’च्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.
अल-निनो आणि दुष्काळाच्या सावटात सह्याद्रीवर कुऱ्हाड
हवामान बदल, दुष्काळाची भीषण परिस्थिती आणि ‘अल-निनो’चे संकट डोक्यावर असताना पश्चिम घाटातील समृद्ध जंगलांवर कुऱ्हाड चालवणे ही बाब आत्मघातकी आणि अत्यंत निंदनीय असल्याचे प्रतिष्ठानने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भीमाशंकर परिसरातील सुमारे पाच हजार वृक्षांची कत्तल होत असल्याच्या वृत्ताने संपूर्ण निसर्गप्रेमी जगतात तीव्र चिंता व्यक्त होत आहे. तसेच रायगडमधील कर्जत-सायडोंगर परिसरात ‘टोरंट पॉवर’ प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे पाडली जात असल्याच्या घटनांनी नागरिक व्यथित झाले आहेत.
दौंडकर पर्यावरणप्रेमींच्या प्रमुख मागण्या:
झाडांची अधिकृत पडताळणी: सुमारे ५ हजार झाडांच्या कत्तलीच्या दाव्यांची शासनाने तातडीने अधिकृत पडताळणी करावी. प्रत्यक्ष तोडलेली झाडे किती आणि तोडण्यास प्रस्तावित असलेली झाडे किती, याचा वस्तुनिष्ठ तपशील जनतेसमोर आणावा. परवानग्यांची माहिती सार्वजनिक करा: या प्रकल्पांसाठी दिलेल्या वृक्षतोडीच्या परवानग्या, पर्यावरणविषयक मान्यता (Environmental Clearance – EC) आणि वनविभागाची ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) जनतेसाठी खुली करावीत. पारदर्शक चौकशी: पर्यावरणाचे नियम डावलून झाडे तोडली जात असल्यास त्याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
“झाड पडते तेव्हा पुढच्या पिढ्यांची सावलीही हिरावली जाते!”
सह्याद्रीच्या पर्यावरणीय आणि ऐतिहासिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करताना निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा सह्याद्री केवळ डोंगररांगांचा प्रदेश नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि पर्यावरणाचा मुख्य श्वास आहे. शिवरायांच्या निसर्गसंवर्धनाच्या मूल्यांचा केवळ अभिमान बाळगून चालणार नाही, तर तो वारसा जपण्याची जबाबदारी शासनाची आहे. एका झाडावर कुऱ्हाड चालते तेव्हा केवळ लाकूड कोसळत नाही; वन्यजीवांचा आसरा, पक्ष्यांची घरटी आणि भावी पिढ्यांची सावली कायमची हिरावली जाते. अनेक दशकांत तयार झालेली ही नैसर्गिक परिसंस्था केवळ नव्याने चार रोपे लावून भरून काढता येत नाही.”
निवेदनावर मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या
सह्याद्रीच्या रक्षणासाठी दौंड तालुक्यातील सजग नागरिकांनी एकजूट दाखवली असून, या निवेदनावर ज्येष्ठ नेते नंदू पवार, माजी नगरसेवक प्रवीण परदेशी, रवींद्र जाधव, सचिन गायकवाड, मनीष परकाळे, उमेश कांचन, दिनेश फराटे, संतोष जगताप, रवींद्र बंड, वैजनाथ जाधव, सतीश पाटील यांच्यासह दौंड तालुक्यातील निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी व जागरूक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.










